कुडका-बांबोळी पंचायत सचिव, बीडीओंना दंड; दिव्यांग व्यक्तींना रॅम्प उपलब्ध न केल्याने कारवाई
By पूजा प्रभूगावकर | Published: July 17, 2023 06:33 PM2023-07-17T18:33:37+5:302023-07-17T18:33:48+5:30
रॅम्प सुविधा उभारावी असे निर्देश राज्य दिव्यांग आयोगाने एका वर्षापूर्वी या पंचायतींना दिले होते.
पणजी : कुडका - बांबोळी व तळावली पंचायतीच्या कार्यालयात दिव्यांग व्यक्तींसाठी प्रवेशयोग्य रॅम्प नसल्याने राज्य दिव्यांग आयुक्तांनी या दोन्ही पंचायतींच्या सचिव तसेच तिसवाडीचे गटविकास अधिकाऱ्याला (बीडीओ) १० हजारांचा दंड ठोठावला आहे. सर्व पंचायतींमध्ये दिव्यांग व्यक्तींना सहज जाणे शक्य होईल, यासाठी रॅम्प आवश्यक आहे. मात्र कुडका - बांबोळी व तळावली पंचायतीच्या कार्यालयांमध्ये ही सुविधा नसल्याने दिव्यांग व्यक्तींना तेथे जाण्यास अडचण होत आहे. त्यामुळे रॅम्प सुविधा उभारावी असे निर्देश राज्य दिव्यांग आयोगाने एका वर्षापूर्वी या पंचायतींना दिले होते.
सदर दंडाची रक्कम सचिव तसेच बीडीओंनी दिव्यांग आयोगाच्या नावे दोन आठवडयांच्या आत जमा करण्याची सूचना केली आहे.कुडका येथील दिव्यांग व्यक्ती मांगिरीश कुट्टीकर यांनी या रॅम्पच्या अनुपल्ब्धे विरोधात राज्य दिव्यांग आयुक्तांकडे तक्रार केली होती. कुडका - बांबोळी व तळावली पंचायतीच्या कार्यालयात पायऱ्या आहेत. तेथे रॅम्प नाही. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना या पायऱ्या चढण्यास अडचण होत आहे. प्रत्येक सरकारी तसेच सार्वजनिक इमारतीत दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प असणे आवश्यक आहे. मात्र सदर पंचायतींमध्ये त्याची अमलबजावणी झाली नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.