गोव्यात पर्रीकर सरकारमध्ये कुरबुरी वाढल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 10:12 AM2017-10-26T10:12:53+5:302017-10-26T10:16:26+5:30
गोव्यात मनोहर पर्रीकर यांचे नेतृत्व मान्य करून सात महिन्यांपूर्वी अधिकारावर आलेल्या सत्ताधारी आघाडीत कुरबुरी वाढल्या आहेत.
पणजी - गोव्यात मनोहर पर्रीकर यांचे नेतृत्व मान्य करून सात महिन्यांपूर्वी अधिकारावर आलेल्या सत्ताधारी आघाडीत कुरबुरी वाढल्या आहेत. एकाबाजूने भाजप व महाराष्ट्रवादी गोमंतक (मगोप) यांच्यातील दरी रुंदावली आहे तर दुसऱ्याबाजूने गोवा फॉरवर्ड विरूद्ध मगोप असाही वाद रंगू लागला आहे.
गेल्या मार्च महिन्यात गोवा विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला. त्यावेळी भाजपाला फक्त तेरा जागा मिळाल्या होत्या. उलट काँग्रेसला सतरा जागा प्राप्त झाल्या होत्या पण पर्रीकर हे जर गोव्यात नेतृत्व करण्यासाठी येत असतील तर आम्ही भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास तयार आहोत असे मगोप आणि गोवा फॉरवर्ड या पक्षांनी त्यावेळी जाहीर केले व त्यानंतर लगेच पर्रीकर यांनी गोव्यात सरकार स्थापन केले. मात्र आता सात महिने सरकारला होताच मगोपने आपल्या मनातील नाराजी जाहीरपणे मांडली व सरकारला काही कडक प्रश्न विचारले. मगोपला पर्रीकर सरकारमध्ये योग्य ती वागणूक मिळत नाही अशी तक्रार माजी आमदार लवू मामलेदार यांनी व्यक्त केली. मंत्री विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सरकारने विविध महामंडळांवर पदे दिली पण मगोपला मात्र तसे काही मिळालेले नाही असे मगोपच्या काही पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे सांगणे सुरू केले आहे. याबाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अजून भाष्य केलेले नाही पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष मंत्री सरदेसाई यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मगोपने जाहीरपणे नाराजी व्यक्त न करता मुख्यमंत्र्यांकडे त्यांचा विषय मांडावा असे तेंडुलकर यांनी म्हटले आहे. मंत्री सरदेसाई यांनी काहीशी उपहासात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गोव्यातील सत्ताधारी आघाडी सरकारचे आपण शिल्पकार असून मगोपसाठी काही सरकारी जागांचा त्याग करण्यास गोवा फॉरवर्ड तयार आहे असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. मात्र मगोपच्या नेत्यांचे समाधान झालेले नाही.
दरम्यान गोवा सरकार आता मंत्री सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्डच्या आग्रहाखातरच एक स्वतंत्र नियोजन व विकास प्राधिकरण स्थापन करत असल्यानेही भाजपचे काही आमदार व मंत्री कुरबुरी करू लागले आहेत. मुख्यमंत्री पर्रीकर हे गोवा फॉरवर्डच्याच कलाने सरकार चालवू पाहतात अशी खंत भाजपाचे काही आमदार व मंत्र्यांनी पत्रकारांकडे बोलताना व्यक्त केली आहे.