‘क्यार’चा धोका टळला; वीज, पाण्याअभावी लोकांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 11:21 PM2019-10-25T23:21:39+5:302019-10-25T23:22:06+5:30
गोव्यात अतिवृष्टीने हाहाकार; पूरपरिस्थितीची भीती
पणजी : अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेले ‘क्यार’ वादळ अखेर घोंगावत किनारपट्टीपासून नेमक्या उलट्या दिशेने पश्चिमेकडे वेगाने सरकत आहे. त्यामुळे किनारपट्टीवर वादळाचा धोका टळला. मात्र, अतिवृष्टी आणि जोरदार वाऱ्यामुळे राज्यात हाहाकार माजला. जनजीवन विस्कळीत झाले.
नद्या-नाल्यांची पातळी वाढल्याने अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली. वीजपुरवठाही खंडित झाला. विजेअभावी पाणीही न मिळाल्यामुळे लोकांचे हाल झाले. वाहनांची कोंडी होऊन लोकांना रस्त्यातच अडकून पडावे लागले.हवामान वेधशाळेने समुद्रातील क्यार वादळाचा परिणाम म्हणून पुढील २४ तासांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. वेधशाळेचे संचालक के. व्ही. पडगीलवार यांनी किनारपट्टीला वादळाचा धोका टळला असल्याचे सांगितले.
ते म्हणाले की, समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्याचे पहाटे तीव्र वादळात रूपांतर झाले. हे वादळ ओमानच्या दिशेने पुढे सरकत आहे. परंतु पावसाची तीव्रता मात्र २४ तास कायम राहील. पुढील बारा तासांत किनाºयावर ताशी ५५ ते ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहील आणि वाºयाचा वेग ताशी ७५ कि.मी.पर्यंत पोहचू शकतो. नंतर वातावरण निवळणार असून पर्यटक २७ नंतर गोव्याला भेट देऊ शकतात. समुद्र प्रचंड खवळलेला असेल व त्यामुळे मच्छीमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये.
जहाजाच्या कप्तानाला अटक करा : मुख्यमंत्री
च्मुरगाव बंदरातून वादळी वाºयामुळे भरकटत दोनापावलपर्यंत आलेल्या नाफ्थावाहू जहाजाच्या कप्तानाला अटक करण्याचे तसेच एमपीटीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले.
भरकटलेल्या या मानवरहित जहाजात सुमारे ३ हजार मेट्रिक टन नाफ्था आहे. त्यामुळे भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी या विषयावर शुक्रवारी तातडीने उच्चस्तरीय बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘नाफ्थाची गळती झाली आहे का हे तपासण्यासाठी खासगी आस्थापनाची मदत घेतली आहे. या जहाजातील नाफ्था अन्य जहाजात हलविण्यात येणार आहे. सोमवारी नवे जहाज दाखल झाल्यानंतर ही कार्यवाही सुरू होईल.’