लाडली लक्ष्मी योजनेचे अर्ज मंजुर पण खात्यात पैसेच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 02:12 PM2019-02-12T14:12:59+5:302019-02-12T14:43:00+5:30
गोवा सरकारच्या महिला व बाल कल्याण खात्याकडून राबविल्या जाणाऱ्या लाडली लक्ष्मी योजनेच्या अर्जदारांना अजुनही अर्थसाह्याच्या प्रतिक्षेत रहावे लागत आहे.
पणजी : गोवा सरकारच्या महिला व बाल कल्याण खात्याकडून राबविल्या जाणाऱ्या लाडली लक्ष्मी योजनेच्या अर्जदारांना अजुनही अर्थसाह्याच्या प्रतिक्षेत रहावे लागत आहे. खात्याने हजारो अर्ज मंजूर केले पण संभाव्य लाभार्थीच्या बँक खात्यात जे प्रत्येकी एक लाख रुपये जमा व्हायला हवेत ते होतच नाही असे आढळून आले आहे. अजर्दार युवती व पालकांमध्ये यामुळे नाराजीची भावना आहे.
लाडली लक्ष्मी योजनेची सुरुवात ही साधारणत: 2012-13 साली झाली. वार्षिक सरासरी दहा हजार युवतींना या योजनेचा अगोदर लाभ मिळायचा. मात्र यावर्षी सरकारकडे निधी नाही म्हणून लाडली लक्ष्मी योजनेच्या लाभार्थीना अर्थसाह्य वेळेत दिलेच जात नाही. वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवतींनी लाडली लक्ष्मी योजनेचे अर्ज भरल्यानंतर व तो अर्ज मंजुर झाल्यानंतर एक लाख रुपये बँकेत येणे योजनेतील तरतुदीनुसार अपेक्षित आहे पण सरकार निधीच देत नसल्याने महिला व बाल कल्याण खात्याची अडचण झाली आहे. 2018-19 साली फक्त पाच कोटी रुपये सरकारने दिले होते. ते लगेच खर्च झाले. आता तातडीने महिला व बाल कल्याण खात्याला किमान वीस कोटी रुपयांची गरज आहे. दोन हजारपेक्षा जास्त अर्ज खात्याने मंजुर करून ते तसेच ठेवले आहेत. एकदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली की, मग या योजनेचा लाभ देणे काही महिन्यांसाठी स्थगित होईल.
युवतींना लग्नासाठी तसेच उच्च शिक्षण किंवा व्यवसायासाठी हे एक लाख रुपये उपयुक्त ठरतात. सरकार सध्या आर्थिक आघाडीवर केवळ कसरती करत आहे. लाडली लक्ष्मी ही लोकप्रिय योजना असून या योजनेचे हजारो अर्ज निर्णयावीनाही खात्याने प्रलंबित ठेवले आहेत. त्या शिवाय दोन हजारपेक्षा जास्त अर्ज मंजुर करून तसेच कपाटात ठेवल्याची माहिती मिळते.