भाजपच्या विरोधकांमध्ये एकजुटीचा अभाव; फोंड्यातील चारही विधानसभा मतदारसंघांत सर्वाधिक सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2023 03:22 PM2023-12-14T15:22:20+5:302023-12-14T15:23:33+5:30
सध्या या चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप सर्वाधिक सक्रिय आहे.
अजय बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : भाजपने सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी विविध योजनाही आखल्या जात आहेत. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या फोंडा तालुक्यात तालुक्यातील तीन व लगतच्या सावर्डे विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. सध्याची राजकीय समीकरणे पाहता, विरोधक पूर्णपणे विखुरलेले आहेत. येथे पूर्वी भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेस व मगो पक्ष सक्रिय असायचा. परंतु आज काँग्रेसची स्थिती कमकुवत आहे तर मगो पक्ष भाजप सरकारमध्ये सत्तेत आहे. सध्या या चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप सर्वाधिक सक्रिय आहे.
गतवेळीच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे रवी नाईक यांच्यासारखा मातब्बर नेता होता. मगोची मते सुद्धा काँग्रेस उमेदवाराकडे वळल्याने काँग्रेसचे काम सोपे झाले होते. परंतु आता समीकरणे बदललेली आहेत. चारही मतदारसंघात हिंदू मतदारांची संख्या अधिक आहे. फक्त फोंडा मतदारसंघात मुस्लिम व खिश्चन मतदारांची संख्या जास्त आहे. परंतु या दोन्ही समाजातील अधिकतर मतदारांवर रवी नाईक व केतन भाटीकर यांचा प्रभाव आहे. त्यातील ५० टक्के मते तरी भाजपकडे वळली जातील.
भंडारी समाजातील मोठे नेते व भाजप सरकारमध्ये मंत्री राहिलेले महादेव नाईक यांची भूमिका लोकसभेत महत्त्वाची राहणार आहे. आम आदमी पक्षाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवताना त्यांनी सहा हजार शंभर मते घेतली होती. आरजी पक्षाने त्यांच्या मताला सुरुंग लावला नसता तर मागच्या वेळी ते निवडून सुद्धा आले असते. शिरोडा मतदारसंघात आम आदमीचे फारसे अस्तित्व नव्हते आणि आताही नाही. त्याचा अर्थ महादेव नाईक यांना मिळालेली सहा हजार मते ही त्यांची स्वतःची होती. त्यांनी भाजपला साथ दिल्यास भाजपला पोषक वातावरण निर्माण होऊ शकते.
विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला येथे अजूनही संघटन बांधता आलेले नाही. गत विधानसभा निवडणुकीत मडकई मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार लवू मामलेदार यांनी पराभवानंतर पक्षाला वाऱ्यावर सोडले आहे. तीच स्थिती शिरोडा मतदारसंघाची होती. तेथील काँग्रेसचे उमेदवार आज कुठेच दिसत नाहीत. सावर्डे मतदारसंघात खेमलो सावंत यांनी जेमतेम ३६० मते मिळवली, परंतु नंतर त्यांनी मतदारसंघात पाय सुद्धा ठेवलेला नाही. थोडक्यात तीनही उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाकडे लक्ष दिलेले नाही. आता संघटन बांधायला त्यांच्याकडे वेळ कमी राहिलेला आहे. त्यामुळेच भाजपला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक एकतर्फी होते की काय, अशी चर्चा येथील मतदारांमध्ये आहे.