मान्सूनपूर्व पावसाच्या अभावी गोव्यातील पाणी प्रकल्पाची पातळी उतरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 04:54 PM2019-05-06T16:54:46+5:302019-05-06T16:55:18+5:30
मान्सूनपूर्व पावसाचे अजुनही आगमन न झाल्याने गोव्यातील पाण्याची समस्या बिकट होण्याच्या वाटेवर आहे.
मडगाव: मान्सूनपूर्व पावसाचे अजुनही आगमन न झाल्याने गोव्यातील पाण्याची समस्या बिकट होण्याच्या वाटेवर आहे. दक्षिण गोव्याला पाणी पुरवठा करणा-या साळावली धरणाच्या पाण्याची पातळी खाली उतरलेली असतानाच उत्तर गोव्यातील फोंडा व तिसवाडी या दोन तालुक्याला पाणी पुरवठा करणा-या ओपा प्रकल्पाची पाण्याची पातळी खाली उतरली आहे. या प्रकल्पातील पाण्याची पातळी 2.45 मीटर वरुन 2.17 मीटरवर पोहोचली आहे. या जलाशयात जो पाण्याचा साठा आहे तो केवळ 15 दिवस पुरेल इतकाच शिल्लक आहे.
या प्रकल्पातील पाण्याची पातळी समतोल ठेवण्यासाठी आता धारबांदोडा तालुक्यातील खाणींच्या खंदकात भरुन राहिलेल्या पाण्याचा वापर केला जात असून कोडली व सातोण-दाभाळ या भागातील खाणीच्या खंदकात जमा झालेल्या पाण्याचा वापर होऊ लागला असून दर दिवशी त्या खंदकातून सुमारे 100 दशलक्ष लिटर पाणी जवळच्या नदीत व नाल्यात सोडले जात आहे. सध्या या खाणीच्या पाण्यावरच या दोन तालुक्यातील पाणी पुरवठय़ाचा प्रबंध केला जात आहे.
सध्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी सेझा गोवाच्या कोडली खाणीवरुन दर दिवशी सुमारे 20 दशलक्ष लिटर तर सोमेश्वर मंदिराजवळ असलेल्या एका बंद खाणीतल्या खंदकातून दररोज 25 दशलक्ष लिटर पाणी खेचले जाते. त्याशिवाय सातोण-दाभाळ येथील झारापकार खाणीवरील खंदकातून सुमारे 25 दशलक्ष लिटर पाणी खेचले जात असल्याची माहिती पाणी खात्याच्या कालव्याची देखभाल करणारे अंकुश गावकर यांनी दिली.