गोव्याच्या आमदारांचा लडाख दौरा रद्द
By किशोर कुबल | Published: September 4, 2023 08:53 PM2023-09-04T20:53:09+5:302023-09-04T20:53:17+5:30
आरोग्य तसेच अन्य कारणे देऊन काही विधिमंडळ सदस्यांनी कळविला नकार
पणजी : गोव्याच्या आमदारांसाठी सभापती रमेश तवडकर यांनी विधिमंडळ खात्यामार्फत आयोजित केलेला लडाखचा अभ्यास दौरा काही आमदारांनी नावे देऊन नंतर तकार कळवल्याने रद्द करण्यात आला आहे.
६ सप्टेंबर ते १० सप्टेंबर या पाच दिवस वरील दौरा होणार होता. सभापती तवडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ‘ दहा ते बारा आमदारांनी दौय्रात सहभागी होण्यासाठी नावे दिली होती. परंतु नंतर काहीजणांनी आरोग्याचे तसेच अन्य कारणे देऊन नकार कळविला. अभ्यास दौय्रासाठी एक- दोन आमदार घेऊन जाण्यात अर्थ नाही. त्यामुळे मी हा दौराच रद्द करण्याचा निर्णय घेतला.’
नवीन तारीख किंवा दौय्रासाठी नवीन ठिकाण नजीकच्या काळात जाहीर केले जाणार आहे का? असा प्रश्न केला असता तसे अद्याप काही ठरलेले नाही, असे तवडकर यांनी सांगितले.दरम्यान, अलिकडे चार पाच वर्षात आमदारांचे अभ्यास दौरे झालेच नव्हते. कलम ३७० मागे घेतल्यानंतर लेह, लडाखचा झालेला विकास आमदारांनी अभ्यासावा हा या दौय्रामागचा हेतू होता. तेथील पर्यटन उपक्रम, सुरक्षा व्यवस्था या गोष्टीही आमदारांना अभ्यासता येणार होत्या. परंतु आता दौराच रद्द झाल्याने आमदार या गोष्टींना मुकले आहेत.