महिला पोलीस कर्मचाऱ्याचा रस्ते अपघातात दुर्दैवी अंत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 09:05 PM2019-07-26T21:05:43+5:302019-07-26T21:08:53+5:30
डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
वास्को: गोवा पोलीसात भरती असलेल्या महीला पोलीस शिपाई शैला गवंडर आज (दि.२६) सकाळी कामासाठी दुचाकीने वास्को पोलीस स्थानकावर येत असताना माटवे दाबोळी भागात झालेल्या अपघातात तिचा जागीच दुर्देवी अंत झाला. २३ वर्षीय शैला ही तरुणी चिंबेल येथील रहिवासी असून मागच्या दोन वर्षापासून ती वास्को पोलीस स्थानकात शिपाई म्हणून कार्यरत होती.
पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी ८.४० च्या सुमारास सदर अपघात झाला. शैला गवंडर ही महिला पोलीस शिपाई सकाळी वास्को पोलीस स्थानकावर कामाला येण्यासाठी ‘ऍक्टीव्हा’ दुचाकीने (क्र: जीए ०७ एए ५८८३) निघाली होती. जेव्हा ती दुचाकीने माटवे दाबोळी येथील जासिंन्तो बेट बाहेरील रस्त्यावर पोहोचली, त्यावेळी तिची दुचाकी रस्त्यावर घसरून दुचाकीसहीत ती रस्त्यावर खाली कोसळली. शैला दुचाकीसहीत रस्त्यावर कोसळण्यावेळी तिच्या दुचाकीची अन्य एका दुचाकीला धडक बसल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी पुढे दिली.
सकाळी मुसळधार पाऊस पडल्याने रस्ता ओला झाल्याने यामुळे तिची दुचाकी घसरली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. सदर अपघात घडल्यानंतर शैलाला त्वरित उपचारासाठी चिखली येथील उपजिल्हा इस्पितळात नेले, मात्र येथे आणण्यापूर्वीच ती मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शैला काही वर्षापूर्वीच गोवा पोलिसात शिपाई म्हणून रुजू झाल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी देऊन दोन वर्षापासून ती वास्को पोलीस स्थानकावर कामाला असल्याचे सांगितले. वेर्णा पोलिसांनी सदर अपघाताचा तसेच शैलाच्या मृतदेहाचा पंचनामा करून नंतर तिचा मृतदेह शवचिकित्सेसाठी बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात पाठवून दिला. तिच्या मृतदेहावर शवचिकित्सा केल्यानंतर तो तिच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आलेला असल्याचे पोलीसांनी सांगितले. सदर प्रकरणाचा वेर्णा पोलीस अधिक तपास करीत आहेत.