लईराई मंदिर काढणार खाण लीजमधून बाहेर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
By वासुदेव.पागी | Published: December 27, 2023 03:38 PM2023-12-27T15:38:07+5:302023-12-27T15:38:20+5:30
Goa News: बुधवारी डिचोली येथे एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी सांगितले की श्री लहराई देवीचे मंदिर खाण लीजातून वगळण्यात येणार आहे. मंदिरासोबतच परिसरातील जागाही देवस्थानाला देण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
- वासुदेव पागी
पणजी - शिरगावातील श्री लईराई देवीचे प्रसिद्ध मंदिर खाण लीजमधून बाहेर काढणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले आहे. अलिकडेच ज्या खण लिज क्लस्टर्डचा खाण खात्याकडून लिलाव करण्यात आला होता, त्या डिचोलीतील शिरगाव खाण लीज क्षेत्रात शिरगांवचे दैवत असलेले प्रसिद्ध लईराई देवीच्या देवळाचाही समावेश करण्यात आला होता. त्यामुळे लोकांनी या खाण लीजला प्रखर विरोध केला होता. त्यामुळे खाण लीजांचा लिलाव होऊनही खनिज उद्योग सुरू होईल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
बुधवारी डिचोली येथे एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी सांगितले की श्री लहराई देवीचे मंदिर खाण लीजातून वगळण्यात येणार आहे. मंदिरासोबतच परिसरातील जागाही देवस्थानाला देण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु, खाणी सुरू करण्यात कोणतेही अडथळे आणू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी लोकांना केले.
खाणी लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे असून त्यासाठी सरकार विविध मार्गांनी प्रयत्न करीत आहे. लोकांनी या कामात सरकारला साथ द्यावी. खाणींना विरोध करून अडथळे आणू नये असे आवाहनही त्यांनी केले.