नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा देण्यासाठी मुरगावातून मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 10:19 PM2020-02-02T22:19:03+5:302020-02-02T22:19:13+5:30
भारत देशाच्या हितासाठी तयार केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे आमच्या देशातील कुठल्याच धर्माच्या - जातपातीच्या बांधवांना कुठल्याच प्रकारचा त्रास होणार
वास्को: भारत देशाच्या हितासाठी तयार केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे आमच्या देशातील कुठल्याच धर्माच्या - जातपातीच्या बांधवांना कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नसून विरोधक स्वतःच्या स्वार्थासाठी खोटी माहिती पसरवून अशांती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायदा भारताचे रक्षण करण्यासाठी तयार करण्यात आलेला असून, प्रत्येक नागरिकांनी या कायद्याला मनापासून पाठिंबा देणे अत्यंत गरजेचे आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे कुठल्या एकही भारतीयाला त्रास होत असल्याचे त्यांनी सिद्ध करून दाखवावे व तो ते सिद्ध करण्यास यशस्वी ठरल्यास या कायद्याला भविष्यात आम्हीसुद्धा विरोध करू, असे माजी सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी सांगून विनाकारण देश हितासाठी बनवण्यात आलेल्या या कायद्याला विरोध करू नका, असे बोलताना स्पष्ट केले.
रविवारी (दि.२) संध्याकाळी दक्षिण गोव्यातील वास्को शहरात ‘मुरगाव सर्पोट सीएए’ च्या नावाखाली नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठींबा दर्शविण्यासाठी आयोजीत पदयात्रेला उत्कृष्ठ प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. मुरगाव तालुक्यात असलेल्या वास्को, मुरगाव, दाबोळी व कुठ्ठाळी अशा चारही मतदारसंघातील नागरीकांसाठी या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून यात दहा हजाराहून जास्त नागरीकांनी सहभाग घेऊन नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला पूर्ण पाठींबा दर्शविल्याचे दिसून आले.
मुंडव्हेल, वास्को येथील कदंब बसस्थानकाच्या परिसरातून सदर पदयात्रेची सुरवात झाल्यानंतर ही पदयात्रा सेंट अॅन्ड्रु चर्च परिसर, स्वतंत्र पथ मार्ग, वास्को रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरातून होऊन नंतर या पदयात्रेची सांगता वास्कोत असलेल्या साईबाबा मंदिराच्या बाहेरील परिसरात झाली. दहा हजाराहून जास्त संख्येने उपस्थित नागरीकांच्या या पदयात्रेत पंचायतमंत्री मवीन गुदिन्हो, नगरविकासमंत्री मिलींद नाईक, वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा, मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत, माजी सभापती राजेंद्र आर्लेकर, नगरसेवक दिपक नाईक, माजी खासदार नरेंद्र सावईकर, फार्तोड्याचे माजी आमदार दामू नाईक, साकवाळ पंचायतीचे सरपंच गीरीश पिल्ले तसेच इतर अनेक नेते उपस्थित असल्याचे दिसून आले. पदयात्रेनंतर येथे आयोजीत सभेच्या वेळी उपस्थितांशी बोलताना राजेंद्र आर्लेकर यांनी मुरगाव तालुक्यातील एवढ्या मोठ्या जनसमुदायाने नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला पाठींबा दिल्याने त्यांनी नागरीकांचे प्रथम आभार व्यक्त केले. भारत व भारतीयांच्या हीताचा पूर्ण विचार करून नागरिकत्व दुरूस्ती कायदा तयार करण्यात आलेला असून या कायद्यामुळे कुठल्याच भारतीयाला कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नसल्याचे आर्लेकर यांनी सांगितले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या विकासासाठी उत्तम पावले उचलत असल्याने विरोधी गडबडलेले असून यामुळेच ते या कायद्याबाबत नागरीकात अफवा पसरवून देशात अशांती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आर्लेकर यांनी सांगितले. देशातील जास्तित जास्त नागरीक या कायद्याला पाठींबा देत असून देशहीतासाठी प्रत्येकांने या कायद्याला मनापासून पाठींबा देणे गरजेचे असल्याचे आर्लेकर शेवटी म्हणाले.
नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांनी या सभेत बोलताना देशाच्या हितासाठी तयार केलेल्या या कायद्याला फक्त १० टक्के नागरीक विरोध करत असल्याचे सांगून विरोधकांनी त्यांच्या मनात घातलेल्या खोट्या माहीतीमुळेच त्यांच्याकडून सदर विरोध होत असल्याचे सांगितले. सदर कायद्यामुळे कुठल्याच धर्माच्या बांधवांना भारतात कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नसून देशहीतासाठी सर्व धर्मांच्या बांधवांनी एकत्र राहणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. मोदी सरकारने यापूर्वी दिलेली विविध आश्वासने पूर्ण केलेली असून आता सुद्धा ते त्यांच्याकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्ती करत असल्याने विरोधक गडबडलेले असून यामुळेच ते नागरिकत्व कायद्याच्या नावाखाली जनतेच अशांती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नाईक यांनी केला. नागरिकांनी या अफवांच्या बळी न पडता देशाच्या विकासासाठी पुढाकार घेणे गरजेचे असून केंद्र सरकार सर्वांच्या हीतासाठी काम करत असल्याचे ते शेवटी म्हणाले.
पंचायतमंत्री मवीन गुदिन्हो यांनी बोलताना ज्या प्रमाणात सदर कार्यक्रमाला नागरिकांची उपस्थिती झालेली आहे ती पाहता देशातील बहुमत नागरिक नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या बाजूने असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याचे सांगितले. नागरिकांना साफ माहीत आहे की नागरिकत्व दुरुस्ती कायदा देशाच्या हितासाठी आहे, यामुळेच सदर कार्यक्रमाला एवढी उपस्थिती दिसून आल्याचे ते शेवटी म्हणाले. सदर कार्यक्रमाच्या वेळी इतर मान्यवरांनी उपस्थित नागरिकांना संबोधीत करून नागरिकत्व दुरुस्ती कायदा देश हितासाठीच केलेला असल्याचे सांगितले. रविवारी आयोजीत करण्यात आलेल्या सदर पदयात्रेत हिंदू बांधवाबरोबरच इतर धर्मातील बांधवांची उपस्थिती असल्याचे दिसून आले. या पदयात्रेत उपस्थित असलेल्या शेकडो बांधवांच्या हातात ध्वज तसेच नागरिकत्व कायद्याला पाठिंबा दर्शविणारी फलके असल्याचे दिसून आले.