दक्षिण गोव्यात रेल्वे मार्ग रुंदीकरणाला मोठा विरोध, कोळशाचे प्रदूषण होण्याची भिती व्यक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 04:11 PM2020-10-30T16:11:47+5:302020-10-30T16:11:59+5:30
Goa News: रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी सासष्टीतील रेल्वे लॅव्हल क्राॅसिंग बंद करण्याची दिलेली परवानगी त्वरीत मागे घ्या व दुपदरीकरणाची सर्व कामे थांबवा अशी मागणी
मडगाव: गोव्यातून कर्नाटकात कोळशाची वाहतूक सुलभ व्हावी यासाठी रेल्वे मार्ग दुपदरीकरण आणि सागरमाला हे प्रकल्प केंद्र सरकार राज्यात कोणत्याही परिस्थितीत पुढे रेटू पाहत असून दक्षिण गोव्यातून या दोन्ही प्रकल्पना विरोध वाढू लागला आहे. यासंदर्भात 'गोयांत कोळसो नाका' या झेंड्याखाली सुरू केलेले आंदोलन उग्र स्वरूप धारण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या रुंदीकरण प्रकल्पाचाच एक भाग म्हणून दक्षिण गोव्यात तीन ठिकाणी रेल्वे फाटके बंद ठेवून काम हाती घेण्याची परवानगी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी दिली होती. ही परवानगी मागे घ्यावी अशी मागणी शुक्रवारी आंदोलकांनी त्यांची भेट घेऊन केली. यापूर्वी या आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ही परवानगी मागे न घेतल्यास कायदा आणि सुव्यवस्था बिघण्याची शक्यता असेल असा इशाराही दिला होता. या आंदोलनाला गोवा फॉरवर्ड, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. दक्षिण गोव्यातील 24 ग्राम पंचायतींनी या विस्ताराला विरोध केला आहे. या आंदोलनाचा एकूण रागरंग पाहता गोव्यात यापुढे हे कोळसा विरोधी आंदोलन भडकणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी सासष्टीतील रेल्वे लॅव्हल क्राॅसिंग बंद करण्याची दिलेली परवानगी त्वरीत मागे घ्या व दुपदरीकरणाची सर्व कामे थांबवा अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहुन केली आहे.
आज गोव्यात पर्यावरणास धोका निर्माण करणाऱ्या रेल्वे दुपदरीकरण, राष्ट्रीय महामार्गाचा विस्तार व वीज वाहिनी टाकण्याचा प्रकल्प यांना जनतेचा तिव्र विरोध आहे. कोळसा वाहतुकीसाठी रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्याच्या प्रयत्न सरकारने चालविला असुन, लोक आता रस्त्यावर येवुन त्याला विरोध करीत आहेत असे दिगंबर कामत यांनी आपल्या पत्रातुन जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणुन दिले आहे.
२८ ॲाक्टोबर रोजी नेसाय येथे लोकांनी सावथ व्हेस्टर्न रेल्वे व रेल्वे विकास निगमच्या रेल्वे दुपदरीकरण कामास विरोध करीत मध्यरात्री निदर्शने केली असे सांगुन, यापुढे २ नोव्हेंबर रोजी गिरदोली चांदर येथे तसेच ९ नोव्हेंबर रोजी दवर्ली येथे सदर काम होत असताना लोक निदर्शने करणार असल्याचे सांगुन, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
जिल्हाधीकाऱ्यानी लोकभावनांचा आदर करुन रेल्वेला दिलेली परवानगी ताबडतोब मागे घ्यावी दुपदरीकरणा सबंधीची सर्व कामे बंद करण्याचे आदेश द्यावेत असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.