लताजींच्या ध्यासाने माझा आवाज मधुर बनला, अनुराधा पौडवाल यांचे उद्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 10:02 PM2018-01-09T22:02:29+5:302018-01-09T22:02:50+5:30
माझा मूळ आवाज हा इतका गोड नव्हता. परंतु बालपणी एकदा लता मंगेशकर यांचे स्टुडिओमध्ये चाललेले रेकॉर्डिंग ऐकले व लतादीदींचा आवाज माझ्या मना काळजावर कोरला गेला.
पणजी: माझा मूळ आवाज हा इतका गोड नव्हता. परंतु बालपणी एकदा लता मंगेशकर यांचे स्टुडिओमध्ये चाललेले रेकॉर्डिंग ऐकले व लतादीदींचा आवाज माझ्या मना काळजावर कोरला गेला. त्या क्षणापासून सतत त्यांच्याच आवाजाचा ध्यास घेतला आणि चमत्कार व्हावा तसा माझा आवाज गोड झाला. हे उद्गार आहेत, विख्यात पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचे. त्यांच्या गोव्या भेटीदरम्यान कला अकादमीत घेतलेल्या प्रकट मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.
स्वस्तिक व कला अकादमीतर्फे आयोजित केलेल्या हितगूज कार्यक्रमात प्रा. संगीता अभ्यंकर यांनी पौडवाल यांच्या घेतलेल्या प्रकट मुलाखतीत पौडवाल यांनी आपल्या संगीतमय जीवनातील ब-याच गोष्टी उघड केल्या. त्या म्हणाल्या एखाद्या गोष्टीचा जर मनापासून ध्यास घेतला तर ती गोष्ट प्रत्यक्षात उतरते, याचा मला प्रत्यय आला आहे. चौथी इयत्तेत असताना लताजींचा आवाज स्टुडिओत ऐकला आणि त्या आवाजाची कायम मोहिनी माझ्यावर पडली. मलाही तसाच आवाज पाहिजे यासाठी ध्यास धरला होता. त्यातच मी न्युमोनियामुळे ४० दिवसांहून अधिक काळ आजारी पडले होते. त्याकाळात लताजींच्या आवाजातील भगवद्गीता आणि त्यांची गाणी कायम ऐकत राहिले. त्यांचा आवाज ऐकत आजारातून बरीही झाले तेव्हा चमत्कारच व्हावा तसा माझा आवाजही पूर्वीचा राहिला नव्हता. अगधी लतादितींसारखा हुबेहूब नसला तरी खूपच जवळ गेल्याचे जाणवत होते.
बहुतेक गुणवान मुली या लग्नापूर्वी गाण्यात खूप नाव कमावतात आणि लग्न झाल्यानंतर गाणे कुठे तरी हरवून जाते. आपले मात्र एकदम उलट झाल्याचे पौडवाल यांनी सांगितले. लग्नापूर्वी केवळ आवड होती म्हणून गुणगुणत होते. कार्यक्रम, रेकॉर्डिंग वगैरे काहीच नव्हते. लग्न होऊन एक मुलगी झाल्यानंतर स्टुडिओत गाणे झाले आणि नंतर पार्श्वगायिकाही झाली, असे त्या म्हणाल्या. गायनाची आवड होतीच. पती अरुण पौडवाल हे संगीत इंडस्ट्रीमध्ये होतेच. परंतु वशिला लावून मला इंडस्ट्रीत नेण्याच्या विरोधात ते होते. माझे सासरे आपल्या ओळखीचा उपयोग करून गणेशोत्सवासारख्या कार्यक्रमात माझे गायन होईल, याची व्यवस्था करीत होते. अशाच एका कार्यक्रमात मला मानधन म्हणून ३०० रुपये मिळाले होते. त्या ३०० रुपयांची गोडी इतकी अवीट होती की त्याची सर आताच्या लाखो रुपयांना नाही, असे त्या म्हणाल्या.
युवक-युवतींना संदेश देताना त्यांनी यशाचे शिखर हे आपण ठरवायचे असते, असे सांगितले. अमुक एका व्यक्तीने अमुक उंचीपर्यंत मजल मारली म्हणून आपल्यालाही तितकीच मारावी लागेल हा विचार चुकीचा आहे. ती त्यापेक्षा अधिक वरही असू शकते किंवा जरा खालीही असू शकते. हे लक्ष्य आपण स्वत: ठेवावे आणि मुख्य म्हणजे ते समाधान देणारे असावे, असे त्यांनी सांगितले.