... तर आम्ही विरोधात बसणार - सुभाष वेलिंगकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 01:24 PM2019-04-27T13:24:32+5:302019-04-27T13:30:40+5:30
विधासभेच्या पोटनिवडणुकीत जर गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार विजयी झाले तर आम्ही विरोधात बसू, भाजपा किंवा काँग्रेसला आम्ही पाठींबा देणार नाही, असे सुरक्षा मंचचे प्रमुख प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी लोकमतला सांगितले आहे.
पणजी - विधासभेच्या पोटनिवडणुकीत जर गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार विजयी झाले तर आम्ही विरोधात बसू, भाजपा किंवा काँग्रेसला आम्ही पाठींबा देणार नाही, असे सुरक्षा मंचचे प्रमुख प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी लोकमतला सांगितले आहे.
वेलिंगकर हे आयुष्यात प्रथमच स्वत: उमेदवार या नात्याने विधानसभेची पोटनिवडणूक लढवत आहेत. ते पणजी मतदारसंघातून लढतील. या शिवाय म्हापसा, शिरोडा आणि मांद्रे अशा तीन मतदारसंघांमध्ये सुरक्षा मंचने उमेदवार उभे केले होते. त्या निवडणुकांचा निकाल अजून आलेला नाही.
सुभाष वेलिंगकर म्हणाले, की आपण पणजीत जिंकण्यासाठीच लढत आहे. मात्र तत्त्वाधिष्ठीत आणि मूल्याधिष्ठीत राजकारणाशी आपण तडजोड करणार नाही. आपल्यासह गोवा सुरक्षा मंचचे अन्य तीन उमेदवार जर जिंकले तर आम्ही विरोधात बसणार आहोत. आम्ही आमचे सिद्धांत सोडणार नाही. आम्ही सत्तेवर येण्यासाठीच निवडणुकीच्या राजकारणात उतरलो आहोत पण जोपर्यंत आम्ही आमच्या सिद्धांताच्या आधारे सत्तेवर येत नाही, तोर्पयत आम्ही विरोधात बसू. आम्हाला सरकार स्थापन करायची संधी मिळेल तेव्हा आम्ही सरकार बनवू. मात्र आम्हाला तत्त्वांचे राजकारण करायचे आहे. पैशांचे नव्हे.
वेलिंगकर म्हणाले, की आम्ही बचत करणारे लोक आहोत. पैसा उगाच कसाही खर्च करायचा नसतो. म्हणूनच आमच्या गोवा सुरक्षा मंचच्या ज्या बैठका होतात, त्या कधी अरविंद भाटीकर तर कधी अन्य पदाधिकाऱ्याच्या किंवा मार्गदर्शकाच्या घरी होतात. कधी स्नेहलता भाटीकर तर कधी अन्य एखादी वहिनी गोवा सुरक्षा मंचच्या कार्यकर्त्यांना जेवू घालते. आम्ही हॉटेलमध्ये बैठका घेत नाही. पैशांची उधळपट्टी करत नाही. तत्त्वाधिष्ठीत राजकारण करणाऱ्यांच्या मागे मतदार निश्चितच राहतात. आम्हालाही मतदारांचा पाठींबा व विश्वास प्राप्त होईल. आम्हाला सत्ता मिळण्यास कितीही विलंब झाला तरी चालेल पण राजकारणाच्या शुद्धतेचा आग्रह आम्ही सोडणार नाही. राजकीय शुद्धतेला आम्ही पणजीहून आरंभ करत आहोत.
माजी संघचालक भाजपाविरुद्ध रिंगणात, मुल्यांचे राजकारण करण्याची हमी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी गोवा संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर हे शेवटी पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपाविरुद्ध पोटनिवडणूक लढविणार आहेत. त्याविषयीची घोषणा शुक्रवारी (26 एप्रिल) पणजीत करण्यात आली आहे. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतरची सहानुभूती पणजीत आता निश्चितच नाही, पर्रीकरांविषयी लोकांना आदर असला तरी, पणजीचे मतदार शेवटी पणजीचे हित लक्षात घेऊनच मतदान करतील, ते कुणा एका कुटूंबाला मते देणार नाहीत, असे सुभाष वेलिंगकर यांनी सांगितले आहे.
गोवा सुरक्षा मंचातर्फे वेलिंगकर लढणार आहेत. सुरक्षा मंचाचे मार्गदर्शक अरविंद भाटीकर यांनी वेलिंगकर यांच्या नावाची पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली आहे. पणजीतील लोकांनी वेलिंगकर यांनाच तुम्ही उमेदवार म्हणून उभे करा, आम्ही पाठींबा देऊ असे आम्हाला सांगितले व त्यामुळे सुरक्षा मंचाने वेलिंगकर यांचे नाव निश्चित केल्याचे अरविंद भाटीकर म्हणाले आहेत.