नौदलासाठी गोव्यात प्राचीन तंत्राचा वापर करून बोट बांधकामाचा शुभारंभ
By किशोर कुबल | Published: September 12, 2023 02:39 PM2023-09-12T14:39:36+5:302023-09-12T14:42:44+5:30
केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते आज या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.
दिवाडी : नौदलासाठी प्राचीन तंत्राचा वापर करून बोट बांधण्याचा अनोखा उपक्रम गोव्यातील या छोट्या बेटावर हाती घेतला आहे. ही बोट बांधून पूर्ण झाल्यावर सागरी परिक्रमाही आयोजित केली जाणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते आज या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.
दिवाडी येथील होडी इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही जहाज बांधणी कंपनी, भारत सरकारचे संस्कृती मंत्रालय आणि भारतीय नौदलाने या संबंधी अलीकडेच त्रिपक्षीय करार केला आहे. भारताचा प्राचीन सागरी वारसा पुनरुज्जीवित करणे हा या मागचा उद्देश आहे. केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी या प्रसंगी बोलताना म्हणाल्या की, भारताला खूप समृद्ध आणि प्राचीन सागरी परंपरा आहे. जी आधुनिक भारतातली मोठ्या वर्गाला माहीत नाही. म्हणूनच प्राचीन तंत्राचा वापर करून जहाज तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला. ही बोट बांधून पूर्ण झाल्यावर सागरी परिक्रमाही आयोजित केली जाईल'
नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार म्हणाले की, 'भारतीय नौदलाने नेहमीच देशाच्या समृद्ध आणि प्राचीन सागरी परंपरेचे समर्थन केले आहे. भारत सरकारच्या या ऐतिहासिक प्रकल्पात सहभागी होताना आम्हाला खूप आनंद होत आहे.' प्रकल्पाविषयी तपशीलवार माहिती देताना, होडी इनोव्हेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रथमेश दांडेकर म्हणाले, की, ' लाकडावर पारंपरिक डिंक आणि तेल वापरुन प्राचीन तंत्रांचा वापर करून काळजीपूर्वक जहाज बांधून भारताच्या समृद्ध सागरी परंपरेला पुनरुज्जीवित करणे हे या प्रकल्पाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.बोट बांधून पूर्ण झाली की ऐतिहासिक व्यापारी मार्गांचा मागोवा घेत ती प्रवासाला निघणर आहे.'
जहाज 'स्टिचिंग'चे प्राचीन तंत्रज्ञान तब्बल दोन हजार वर्षे जुने आहे. ही कला पुनरुज्जीवित करणे हा हेतू आहे. पुरातन काळात महासागरात जाणाऱ्या जहाजांच्या बांधकामासाठी या तंत्रज्ञान वापर केला जात असे. २०२५ साली भारतीय नौदल या बोटीवरुन परिक्रमा करील, अशी योजना आहे. पंतप्रधान आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य संजीव सान्याल यांच्या कल्पनेतून हा उपक्रम साकारला आहे. ते म्हणाले की, भारताला मोठी सागरी परंपरा आहे. जहाज 'स्टिचिंग'चे प्राचीन तंत्रज्ञान युरोपियन जहाजे भारतात येईपर्यंत अस्तित्वात होते. नंतर ते लोप पावले. १८ महिन्यात बांधकाम पूर्ण होईल. नंतर सहा महिने चाचणी घेतली जाईल व दोन वर्षात ही बोट प्रतिक्रियेसाठी सज्ज होईल. कार्यक्रमाला नौदल कर्मचारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.