लक्ष्मीदास बोरकर पुरस्कार राजू नायक यांना जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 12:07 PM2018-11-14T12:07:56+5:302018-11-14T12:13:52+5:30
प्रसिद्ध पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मीदास बोरकर पत्रकारिता पुरस्कार ‘लोकमत’च्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांना जाहीर झालेला आहे. बोरी विकास न्यासतर्फे १८ नोव्हेंबर रोजी बोरी येथे होणाऱ्या ‘बोरी उत्सवा’त दिला जाणार आहे.
फोंडा (गोवा) : प्रसिद्ध पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मीदास बोरकर पत्रकारिता पुरस्कार ‘लोकमत’च्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांना जाहीर झालेला आहे. बोरी विकास न्यासतर्फे १८ नोव्हेंबर रोजी बोरी येथे होणाऱ्या ‘बोरी उत्सवा’त दिला जाणार आहे. १८ नोव्हेंबरला सायं. ४ वाजल्यापासून ७ वाजेपर्यंत बोरी उत्सव आयोजिलेला आहे. पाणीवाडा येथील मारुतीगड येथे हा उत्सव होईल. जगभरातील बोरीकर कुटुंबीय, बोरीचे ग्रामस्थ आणि बोरीतील सर्व संस्था एकत्रितपणे दरवर्षी हा उत्सव आयोजित करतात. यानिमित्ताने विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कार दिले जातात.
मेजर डॉ. माबलू दोतू बोरकर स्मृती बोरी धन्वंतरी भूषण पुरस्कार प्रख्यात आर्थोपेडिक तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. दीपचंद भास्कर भांडारे यांना जाहीर झालेला आहे. सामाजिक कार्यकर्त्या, ‘बायलांचो साद’ संघटनेच्या संस्थापक डॉ. सबिना मार्टिन्स या रुक्मिणीबाई बोरकर स्मृती समाजसेवा पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. कवी बाकीबाब बोरकर स्मृती पुरस्काराने प्रख्यात कोकणी कवी हरदत्त खांडेपारकर यांना गौरवले जाणार आहे.
येत्या १८ तारखेला होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी म्हादई बचाव अभियानाच्या अध्यक्षा निर्मला सावंत असतील. प्रख्यात साहित्यिक महाबळेश्वर सैल या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विविध स्पर्धांतील विजेत्यांना या वेळी बक्षीस वितरण केले जाणार आहे. तसेच बोरी विकास न्यासतर्फे कचरा व्यवस्थापन, नेत्रदान, शिक्षण, क्रीडा आदी क्षेत्रांत केलेल्या कामाचे दृकश्राव्य सादरीकरणही केले जाईल.