श्रीपाद नाईक भेटले, रमाकांत खलपांचाही फोन: लक्ष्मीकांत पार्सेकर, दोन दिवसांत निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2024 09:19 AM2024-04-18T09:19:56+5:302024-04-18T09:20:56+5:30
पुढील काही दिवसांत मी माझी भूमिका घेणार आहे, असे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : 'लोकसभा निवडणुकीत पाठिंब्यासाठी भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक मला भेटून गेले. खलप यांनीही फोन केला होता. पुढील काही दिवसांत मी माझी भूमिका घेणार आहे' असे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.
ते म्हणाले की, 'मी भाजप सोडल्यानंतर कुठल्याही पक्षात गेलेलो नाही, म्हणून मला तसेच मांद्रेतील माझ्या मतदारांनाही गृहित धरु नये. उमेदवाराने अर्ज भरण्याआधीच १ लाख ६० हजार मताधिक्क्याच्या गोष्टी केल्या जातात.'
पार्सेकर म्हणले की, 'तानावडे यांनी अध्यक्षाला साजेसेच बोलावे, एकीकडे ते मांद्रेतील माझे मतदार भाजपकडे वळलेले आहेत व माझ्याकडे कोणीही राहिलेले नाहीत, असा दावा करुन माझी किंमत कमी करतात आणि दुसरीकडे माझ्या भाजप प्रवेशाबद्दल कोणी विचारले तर मी मोठा नेता असल्याने केंद्रातूनच निर्णय घेतला जाईल, असे सांगतात. तानावडे दोन्ही तोंडाने का बोलतात?' असे ते म्हणाले.
आपली भूमिका सांगताना पार्सेकर म्हणाले की, 'मोदींबद्दल देशभरात आदर आहे. परंतु मध्येमध्ये नेत्यांनी अशी बडबड, अभिप्राय देऊत मतदारांना तिटकारा आणू नये. मला संपूर्ण गोवाभरातून फोन येतात. सद्यस्थितीत पक्षाच्या काही स्थानिक नेत्यांनी जे काही चालवले आहे, ते घातक आहे. मांद्रे मतदारसंघात एकटा भाजपला १२ हजारांचे तर दुसरा १५ हजारांचे मताधिक्क्य मिळवून देण्याच्या बाता मारत आहे. ही गोष्ट एवढी सोपी नाहीय, मी राजकारणात सक्रीय नाही, म्हणजे राजकारण सोडले असे नाही. येत्या काही दिवसांत मी या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यावा याबाबत निर्णय घेणार आहे.'