गोव्यातील विरोधी पक्षनेत्याकडे 4.78 कोटींची बेहिशेबी संपत्ती; एसीबीकडून गुन्हा नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 02:54 PM2017-09-16T14:54:44+5:302017-09-16T14:57:12+5:30
गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर ऊर्फ चंद्रकांत कवळेकर यांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून (एसीबी) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पणजी, दि. 16- गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर ऊर्फ चंद्रकांत कवळेकर यांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून (एसीबी) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांची व त्यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांची मिळून एखूण 4.78 कोटी रुपये बेहिशेबी मालमत्ता असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. कवळेकर यांची मालमत्ता 2007 ते 2012 या काळात अनेक पटीने वाढली. त्यांच्या अधिकृत उत्पन्नापेक्षा 59 टक्के मालमत्ता वाढ दाखवित असल्याचे एसीबीचे अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या काळात ते गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष होते. काँग्रेस राजवटीत कवळेकर यांनी गैर मार्गाने आणि आपल्या पदचा गैरवापर करून धनलाभ करून घेतल्याचा आरोप करणारी तक्रार एसीबीत देण्यात आली होती. या प्रकरणात प्राथमिक तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश सरकारने एसीबीला दिला होता. 2012 साली तपास सुरू करण्यात आला होता. तो सप्टेंबर 2017 मध्ये पूर्ण झाला. अशा प्रकारचा इतका प्रदीर्घ काळाचा पहिलाच प्राथमिक तपास ठरला आहे. एसीबीकडून नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यात कवळेकर यांची पत्नी सावित्री कवळेकर यांनाही सहसंशयित करण्यात आले आहे. कारण ज्या पाच व्यावसायिक संस्थांमधील मालमत्तेमळे हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्या सर्व पाचही संस्थांच्या सावित्री या संचालक आहेत.