गोव्यात विरोधी पक्षनेता ठरेना, आजपासून अधिवेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 04:00 AM2019-07-15T04:00:07+5:302019-07-15T04:00:14+5:30
विरोधी पक्षनेता निश्चित झालेला नसला तरी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे.
पणजी : विरोधी पक्षनेता निश्चित झालेला नसला तरी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. दहा काँग्रेस आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन केल्याने तसेच गोवा फॉरवर्ड या स्थानिक पक्षानेही सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने आमदारांच्या आसन व्यवस्थेत बदल केलेला आहे.
काँग्रेसचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार यांनी पाचही काँग्रेस आमदारांशी स्वतंत्र चर्चा केली आहे. माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत यांना विचारले असता अजून विरोधी पक्षनेता ठरलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, विरोधी नेता ठरविण्यासाठी एक-दोन दिवस गेले तरी काही फरक पडणार नाही. सभापती राजेश पाटणेकर यांनी सांगितले की, ११ जुलैपर्यंत ६९0 तारांकित आणि १५४५ अतारांकित प्रश्न आलेले आहेत. ९ आॅगस्टपर्यंत अधिवेशन चालणार असून २0 दिवसांचे कामकाज असेल. बाबू कवळेकर, मायकल लोबो, फिलिप नेरी रॉड्रिग्स व जेनिफर मोन्सेरात आता मंत्री झाले असल्याने त्यांनी विरोधात असताना विचारलेले प्रश्न कामकाजातून वगळले जातील.
पक्षीय बलाबल
एकूण सदस्यसंख्या : ४०, भाजप : २७, काँग्रेस : ५, गोवा फॉरवर्ड : ३, मगोप : १, राष्ट्रवादी : १, अपक्ष : ३