रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाची पहाणी करण्यासाठी विरोधी पक्ष नेते भररात्री रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 05:49 PM2019-09-13T17:49:49+5:302019-09-13T17:53:33+5:30
रस्त्यांची पावसाने दुर्दशा उडवली असून त्याची दुरुस्ती योग्यप्रकारे होते की नाही हे पहाण्यासाठीच ते जातीने हजर होते.
मडगाव - आमदार म्हटले की ती व्यक्ती कुणाला रस्त्यावर हाफ चड्डीत भेटणे मुष्कीलच. मात्र गोव्याचे विरोधी पक्ष नेते असलेले मडगावचे आमदार दिगंबर कामत हे भर रात्री हाफ चड्डीत गुरुवारी रात्री मडगावात फिरत होते. त्याचे कारण म्हणजे, मडगावातील रस्त्यांची पावसाने दुर्दशा उडवली असून त्याची दुरुस्ती योग्यप्रकारे होते की नाही हे पहाण्यासाठीच ते जातीने हजर होते.
मागच्या काही दिवसात गोव्यात मुसळधार पाऊस पडल्याने गोव्यात सगळीकडेच रस्ते खराब झाले आहेत. रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी एकूण स्थिती असून अशातच हे खड्डे खडी टाकून काही ठिकाणी बुजविले गेल्याने त्याचा उलटा परिणाम झाला होता. या खड्डय़ातील खडी वा-याने उडू लागल्याने लोकांना धुळ प्रदुषणाला सामोरे जावे लागले होते. गोव्याची आर्थिक राजधानी मानले गेलेल्या मडगावात हा त्रस अधिकच जाणवत होता. त्यामुळे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी रस्ते त्वरित दुरुस्त झाले नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
या इशा-याचा परिणाम म्हणून असेल कदाचित राष्ट्रीय हमरस्ता विभागाने मडगावातील बिघडलेल्या रस्त्यांची डागडुजी युद्धपातळीवर सुरू केली असून, गुरुवारी रात्री उशिरापर्यंत रस्ते साफ करून पडलेल्या खड्ड्यात कोल्ड मिक्स डांबर घालून ते बुजविण्याचे काम चालू होते. पहाटे 3 वाजेपर्यंत हे काम चालू ठेवले होते.
गुरुवारी दुपारी कामत यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला इशारा देताना जर रात्रीपासून काम सुरू झाले नाही तर मडगावात रास्ता रोको करुन वाहतूक अडवून धरण्याचा इशारा दिला होता. त्याच्या परिणाम प्रती रात्री 9 वाजता फुटलेल्या रस्त्यावरील पडलेली खडी साफ करण्याचे काम सुरु झाले. रात्री 1 वाजेपर्यंत हे काम कसे चालू आहे हे पहाण्यासाठी आमदार दिगंबर कामत चक्क अर्ध्या चड्डीत रस्त्यावर उभे होते. ओल्ड मार्केट सर्कल ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यापर्यंतची डागडुजी केली गेली असून येत्या तीन दिवसात मडगावातील राष्ट्रीय हमरस्त्यांवरील सर्व खड्डे बुजविले जाणार असल्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी दिले आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, या कामासाठी दोन वेगवेगळ्या कंत्रटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका कंत्रटदाराने रस्ता साफ करण्याचे काम हाती घेतले असून दुस-या कंत्रटदाराकडून साफ केलेल्या खड्डय़ात कोल्ड मिक्स डांबर घालण्याचे काम चालू आहे. यासाठी सुमारे 50 कामगार कामाला लावले होते. शुक्रवारी सकाळी लोकांना धुळीचा त्रस सहन करावा लागू नये यासाठी रस्त्यावर टँकरने पाण्याची फवारणी करण्यात आली.
दरम्यान, या कामावर शॅडो कौन्सिलचे सावियो कुतिन्हो यांनीही समाधान व्यक्त केले असून, त्यासाठी त्यांनी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना धन्यवाद दिले आहेत. ज्या कंत्रटदारामुळे हे सर्व रस्ते पावसाच्या पाण्यात धुऊन गेले त्यांना काळय़ा यादीत टाकावे अशी मागणी कुतिन्हो यांनी केली असून येत्या चार पाच दिवसात हे काम पूर्ण करावे अशी मागणी केली आहे. मडगावच्या ज्या व्यापा-यांनी शॅडो कौन्सिलला पाठिंबा दिला त्यांचे आभार मानतानाच जर हे काम व्यवस्थित झाले नाही तर स्थगित केलेले आंदोलन आम्ही पुन्हा सुरु करु असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दक्षिण गोव्यात खड्डे बुजविणे सुरू
मडगाव ते काणकोण आणि मडगाव ते सांगे या दरम्यानच्या रस्त्याला पडलेले खड्डे काही ठिकाणी रेडिमिक्स काँक्रिट तर काही ठिकाणी कोल्ड मिक्स डांबर घालून बुजविण्यास सुरुवात केली असून, जर पावसाने काही काळ विश्रंती घेतली तर येत्या दोन दिवसांत पूर्ण जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास खात्याला यश येईल, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनी व्यक्त केली आहे.
शुक्रवारी पावसाने काही प्रमाणात विश्रंती घेतल्याने या कामाला वेग आला होता. सार्वजनिक बांधकाम खात्याचे कामगार हे काम जलदगतीने व्हावे यासाठी कार्यरत आहेत. लोकांनी त्यांना सहकार्य करावे असे आवाहनही पाऊसकर यांनी केले आहे.