सारीपाटः पक्षाहून नेते मोठे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 03:56 PM2023-05-07T15:56:37+5:302023-05-07T15:57:22+5:30

राजकीय पक्षांपेक्षा त्या पक्षाचे नेते मोठे ठरतात तेव्हा व्यक्तीपूजकांची संख्या वाढत जाते.

leaders are bigger than the party | सारीपाटः पक्षाहून नेते मोठे

सारीपाटः पक्षाहून नेते मोठे

googlenewsNext

- सद्गुरु पाटील

शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नेतृत्व सोडतोय असे जाहीर करताच पक्षात महास्फोट झाला. ही व्यक्तीकेंद्रीत स्थिती लोकशाहीसाठी हितावह नाही. राजकीय पक्षांपेक्षा त्या पक्षाचे नेते मोठे ठरतात तेव्हा व्यक्तीपूजकांची संख्या वाढत जाते. पक्ष वाढला नाही तरी चालेल पण अध्यक्षपद आपल्या प्रिय नेत्याकडेच राहायला हवे ही कार्यकर्त्यांची मानसिकता सर्वच पक्षांमध्ये आढळून येते.

राजकीय पक्षांपेक्षा त्या पक्षाचे नेते मोठे ठरतात तेव्हा व्यक्तीपूजकांची संख्या वाढत जाते. शरद पवार यांच्या राजीनामा नाट्याद्वारे नव्याने महाराष्ट्र रा व पूर्ण देशाला हे अनुभवता आले. यापूर्वी सोनिया गांधीविषयीदेखील असेच घडले होते. पवार यांनी २४ वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. त्यावेळेपासून आतापर्यंत तेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. पक्षाने राष्ट्रीय पक्ष ही मान्यताही गमावली आहे. तरीदेखील पवार हेच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी राहिलेले कार्यकर्त्यांनाही हवे आहे, हे आश्चर्यजनक आहे. ८३ वय झालेले व आरोग्याचेही प्रश्न असलेले पवार जर अध्यक्ष पदावरून पायउतार होत असतील तर पक्षातील अनेक नेत्यांना व कार्यकत्यांना ते नको आहे. पवार यांनी राजीनामा दिला म्हणून काही नेते रडतातही पक्ष वाढला नाही तरी चालेल पण अध्यक्षपद आपल्या प्रिय नेत्याकडेच राहायला हवे ही कार्यकर्त्यांची मानसिकता सर्वच पक्षांमध्ये आढळून येते. पक्षापेक्षा नेते मोठे झाले आहेत हा अनुभव गोव्यापासून दिल्लीपर्यंत सगळीकडेच येत आहे.

मनोहर पर्रीकर हयात असताना गोव्यात भाजपसाठी पर्रीकर म्हणजेच पक्ष झाले होते. गोवा भाजप म्हणजे पर्रीकर असे समीकरण होते. पर्रीकर गोव्यात भाजपचे अध्यक्ष कधीच नव्हते, पण पर्रीकर यांच्याच हाती पक्षाची सारी सुत्रे होती. सगळे प्रदेशाध्यक्ष नावापुरते खुर्चीवर बसून गेले. सदानंद तानावडे या विद्यमान प्रदेशाध्यक्षांचा आता जो प्रभाव दिसतो, तो प्रभाव पर्रीकर हयात असते तर दिसला नसता. व्यक्तीपूजकांची फार मोठी फौज सर्वच पक्षांमध्ये आहे. ही फौजच सक्रिय असते व आपल्याला प्रिय नेत्याकडेच पक्षाचे नेतृत्त्व कायम असावे असा प्रयत्न करत असते. पंतप्रधान मोदी यांना वगळून आज भाजपचा विचार कुणीच करू शकत नाही. पुढील दहा वर्षे तरी मोदी यांच्याशिवाय भाजपचा विचार केलाच जाणार नाही, मोदी म्हणजे भाजप व भाजप म्हणजे मोदी ही स्थिती आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा प्रभाव अनुभवालाच येत नाही. मोदींनंतर पक्षात प्रभाव दिसून येतो तो गृहमंत्री शाह यांचा.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद आता मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे आहे. मात्र पक्षात खरा प्रभाव हा गांधी कुटुंबाचाच आहे. अजूनही सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी म्हणजे काँग्रेस हेच समीकरण आहे. खर्गे आता ८१ वर्षांचे आहेत. जे. पी. नड्डा ६३ वर्षांचे आहेत. आम आदमी पक्षाचे नेतृत्व स्थापनेपासून आतापर्यंत अरविंद केजरीवाल यांच्याकडेच आहे. केजरीवाल यांना वगळून आम आदमी पक्षाची कल्पना करता येत नाही अशी स्थिती आहे. केजरीवाल यांच्यानंतर आपमध्ये मनिष सिसोदिया यांचा प्रभाव होता. सिसोदिया तुरुंगात पोहोचल्यानंतर हा प्रभाव थोडा कमी झाला हे मान्य करावे लागेल. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्या आपण तृणमूल काँग्रेसचे नेतृत्त्व सोडते असे जाहीर केले तर तृणमूलमध्ये अनेक नेते व हजारो कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर येईल. ममता दीदीना वगळून तृणमूल कांग्रेस पक्ष जिवंत राहू शकतो अशी कल्पना अनेकांना सध्याच्या टप्प्यावर सहन होणार नाही, ममता दीदी आज ६८ वर्षांच्या आहेत. अर्थात त्या अजून लढवय्या आहेत. त्यामुळेच राजकारणात टिकल्या. उत्तर प्रदेशच्या ६७ वर्षीय मायावती या बसपा पक्ष स्वतःकडेच घेऊन बसल्या आहेत. मायावतींच्या प्रभावाचा काळ कधीच मागे पडला. आता नव्याने मायावतींचा प्रभाव कदाचित तयारही होणार नाही. ममता बॅनर्जी यांच्याविषयी मात्र तसे घडलेले नाही. तृणमूल काँग्रेसमध्ये ममतांमुळेच ज्ञान आहे, असे बहुसंख्य कार्यकर्ते मानतात. तिथेही व्यक्तीपूजकांची फौज आहेच.

गोव्यात म.गो. पक्षाचे नेतृत्त्व गेली अनेक वर्षे सुदिन व दीपक या ढवळीकर बंधुकडेच आहे. स्वर्गीय शशिकलाताई काकोडकर यांच्यानंतर पांडुरंग राऊत वगैरे नावापुरते मगोचे अध्यक्ष झाले होते. म.गो. पक्षाचे नेतृत्व सुदिन ढवळीकर यांच्या हाती नसते तर कदाचित आता विधानसभेत मगोचा एकही आमदार दिसून आला नसता, असे म्हणण्यासारखी स्थिती आहे. स्व. शशिकला काकोडकर किंवा रमाकांत खलप असे काही नेते आपापल्या मतदारसंघांमध्ये पराभूत झाल्यानंतर प्रभावहीन झाले होते. सुदिन ढवळीकर मात्र आपल्या मडकई मतदारसंघात कधीच पराभूत झालेले नाहीत. १९९९ सालापासून सुदिन सातत्याने विजयी होत आहेत. अजूनही ते विधानसभेत आहेत. त्यामुळेच मगो पक्षात त्यांचा प्रभाव टिकला आणि त्यामुळेच नेतृत्व त्यांच्याकडे राहिले. दीपक ढवळीकर हे जरी मशोपचे अध्यक्ष असले, तरी पक्ष चालवतात (किंवा जिवंत ठेवतात) सुदिन ढवळीकरच बीजमंत्री सुदिन ढवळीकर आता ६६ वर्षाचे, तर दीपक ढवळीकर ६४ वर्षांचे आहेत.

चर्चिल आलेमाव यांनी २००६ सालच्या आसपास सेव्ह गोवा पक्ष स्थापन केला होता, पण लगेच त्यांनी दोन जागा जिंकताच त्या पक्षाचा अवतार संपविला. पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. युगोडेपा हा पक्ष चर्चिलने स्थापन केला नव्हता, पण युजीडीपी म्हणजे चर्चिल असेच समीकरण अनेक वर्षे होते. म्हापशाचे स्वर्गीय श्रीरंग नार्वेकर वगैरे यूजीडीपीचे अध्यक्ष होते. मात्र तेही नावापुरतेच राधाराव ग्रासियस सरचिटणीस होते, पण युजीडीपीला मते मिळवून देण्याचे काम आलेमावच करत होते. आलेमान यांनी युजीडीपी सोडला व काँग्रेसची वाट धरली. त्यानंतर युजीडीपीला अहोटी लागली. आता तर विधानसभेत युजीडीपीचे अस्तित्वदेखील नाही. नेते पक्षांपेक्षा मोठे होतात तेव्हा नेत्यांना पाहूनच लोक मत देत असतात. 

गोव्यात पर्रीकर यांच्यामुळे भाजपला ख्रिस्ती मतदारांचीही मते थोडी तरी मिळायची. दहा बारा वर्षांपूर्वी स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाहून लोक भाजपला मत द्यायचे. आता मोदींमुळे भाजपला विक्रमी प्रमाणात मते मिळतात. ही चांगली बाजू असली, तरी नेत्यांचा प्रभाव पक्षाहून खूपच मोठा होतो तेव्हा धोकाही वाढत जातो. नेता बाजूला झाला की पक्ष ढेपाळतो. अर्थात वाजपेयींनंतर भाजपला मोदींचे अत्यंत प्रभावी नेतृत्व मिळाल्याने भाजपचाही प्रभाव वाढला हे नमूद करावेच लागेल. 

राष्ट्रवादी काँग्रेस किंवा कॉंग्रेसचे मात्र तसे नाही. देशातील अन्य काही पक्षांमध्येही असे दिसून येते की त्या पक्षाचे मुख्य नेतृत्व बाजूला झाले तर तो पक्ष सावरू शकणार नाहीत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे जेडीयू पक्ष आहे. जेडीयू पक्षात सर्वाधिक प्रभावी नितीशकुमारच आहेत. त्यांना बाजूला केले तर तो पक्ष टिकेल का? नितीशकुमार आज ७२ वर्षांचे आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत महाराष्ट्रात शिवसेना होती. बाळासाहेबांचे निधन झाल्यानंतरच्या काळापासून आतापर्यंत शिवसेनेची शकले कशी उडाली हे देश पाहातोच आहे. आता तर अस्तित्वाची लढाई उद्धव ठाकरे लढत आहेत. लालूप्रसाद यादव यांनी व त्यांच्या मुलांनी आरजेडी हा पक्ष आपल्या कुटुंबापेक्षा मोठा होऊ दिला नाही. आरजेडी यादवांकडेच आहे. लालूप्रसाद आता ७५ वर्षांचे आहेत व आरोग्याच्या प्रश्नाने व न्यायालयीन शिक्षेमुळे हैराण आहेत. मात्र त्यांचा पक्ष जिवंत आहे आणि प्रभावीही लालूंच्याच हयातीत त्यांच्या मुलांचे नेतृत्त्व पुढे आल्याने आरजेडीचा बिहारमध्ये प्रभाव राहिला आहे.

शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादीचे नेतृत्व सोडतोय असे जाहीर केल्यानंतर पक्षात महास्फोट झाला. पवार यांनी मग तीनच दिवसांत राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला. ही व्यक्तीकेंद्रीत स्थिती लोकशाहीसाठी हितावह आहे, असे म्हणताच येत नाही.

 

Web Title: leaders are bigger than the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.