नेतृत्वप्रश्नी तोडगा नाही, अमित शहांकडून तिन्ही खासदारांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 09:39 PM2018-09-19T21:39:28+5:302018-09-19T21:40:35+5:30

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष व खासदार विनय तेंडुलकर या तिघांनाही शहा यांनी दिल्लीला बोलावले होते.

Leadership questions will not be resolved, Amit Shahane discusses with three MP's | नेतृत्वप्रश्नी तोडगा नाही, अमित शहांकडून तिन्ही खासदारांशी चर्चा

नेतृत्वप्रश्नी तोडगा नाही, अमित शहांकडून तिन्ही खासदारांशी चर्चा

Next

पणजी - गोव्यातील नेतृत्वप्रश्नी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी सायंकाळी स्वत: तिन्ही खासदारांशी चर्चा केली व त्यांची मते जाणून घेतली. गोव्यातील नेतृत्व बदलाचा लोकसभा निवडणुकीवेळी गोव्यात काय परिणाम होऊ शकतो हे शहा यांनी जाणून घेतले. गोव्यात मुख्यमंत्रीपदासाठी तिघांची नावे चर्चेत असली तरी, अजून कोणताच तोडगा निघालेला नाही.

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष व खासदार विनय तेंडुलकर या तिघांनाही शहा यांनी दिल्लीला बोलावले होते. बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तिन्ही खासदारांसोबत शहा यांची बैठक झाली. गोव्यात नेतृत्व बदल होईल पण गोवा फॉरवर्ड, मगोप या पक्षांसह तीन अपक्षांनाही मान्य होईल असा नेता निवडायचा आहे. सर्वमान्य नेते म्हणून कुणाची निवड करावी याचा अंदाज शहा यांनी घेतला. तसेच मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रीपदी राहिले नाहीत तर लोकसभा निवडणुकीवेळी गोव्यात दोन्ही जागा जिंकता येईल काय हेही शहा यांनी जाणून घेतल्याचे पक्ष सुत्रांनी सांगितले. केंद्रीय निरीक्षक रामलाल, विजय पुराणिक व गोवा भाजप प्रभारी बी.एल. संतोष यांनीही बैठकीत भाग घेऊन आपला अहवाल दिल्याचे सुत्रांनी सांगितले. शहा यांनी गोव्यातील राजकीय स्थिती व घटक पक्षांकडून केले जाणारे दबावाचे राजकारण हे तिन्ही खासदारांकडून जाणून घेतले. निदान लोकसभा निवडणुका होईर्पयत तरी घटक पक्षांना व अपक्षांना दुखवता येणार नाही याची कल्पना शहा यांनी सर्वानाच करून दिल्याचे सुत्रांनी सांगितले. नेतृत्वप्रश्नी बैठकीत चर्चा झालेली नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी पत्रकारांना सांगितले पण प्रत्यक्षात नेतृत्वप्रश्नी चर्चा हाच बैठकीचा प्रमुख विषय होता, अशी माहिती मिळाली.

श्रीपाद, विनय व आमदार प्रमोद सावंत

एकूण तीन नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. बहुजनांचे नेते म्हणून श्रीपाद नाईक यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवावे व त्यांना एखाद्या विधानसभा मतदारसंघातून निवडून आणावे, असे पक्षातील एका गटाला वाटते. विनय तेंडुलकर हे राज्यसभा खासदार असून त्यांच्याकडे सहा महिन्यांसाठी किंवा येत्या लोकसभा निवडणुकीर्पयतच मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवावी व मग पुढील काय तो निर्णय घ्यावा अशा प्रकारची सूचनाही पक्षासमोर आली आहे. नाईक व तेंडुलकर यांना स्वत:चा असा हक्काचा विधानसभा मतदारसंघ नाही. यामुळे साखळीचे आमदार असलेले डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावाचा विचार पुढे येतो. सावंत हे तरुण असून त्यांना मुख्यमंत्रीपदी नेमल्यास पक्ष संघटनेचे कामही गोव्यात वाढविता येईल, अशा प्रकारचा फॉर्म्युला काहीजणांनी बैठकीत मांडला. मात्र, प्रमोद सावंत यांच्या हाताखाली ढवळीकर व अन्य ज्येष्ठ मंत्री काम करू शकणार नाहीत. मात्र शेवटी मुख्यमंत्रीपदासाठी अंतिम नाव निश्चित करण्यापूर्वी शहा हे विजय सरदेसाई व सुदिन ढवळीकर या दोन मंत्र्यांशी व्यक्तीश: बोलणार आहेत. 

पर्रीकरांना केमो 
मुख्यमंत्री पर्रीकर हे दिल्लीतील एम्स इस्पितळात उपचार घेत आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी कुणाचेही नाव निश्चित करण्यापूर्वी शहा हे र्पीकर यांच्याशी चर्चा करणार आहेत. मात्र, पर्रीकर यांना पुढील तीन दिवस शहा किंवा अन्य कुणी भेटू शकत नाहीत. कारण पर्रीकरांना केमोथेरपी दिली जात आहे. त्या काळात जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून खूप काळजी घ्यावी लागते. अन्य कुणी पर्रीकर यांना भेटू शकत नाहीत. मंत्री विजय सरदेसाई यांनी पर्रीकर यांच्याशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला होता पण पर्रीकर फोनवर उपलब्ध होऊ शकले नाहीत, असे सुत्रांनी सांगितले. श्रीपाद नाईक यांचे नाव पर्रीकर मान्य करतील काय हा मोठा प्रश्न आहे. तेंडुलकर किंवा प्रमोद सावंत यांचे तरी नाव पर्रीकर यांना मान्य होईल काय याची कल्पना भाजपच्या कोअर टीमला देखील नाही. पर्रीकर यांनी तरी याप्रश्नी कोअर टीमशी अंतरच राखले आहे.
 

Web Title: Leadership questions will not be resolved, Amit Shahane discusses with three MP's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.