सरकारला आजारी रजा द्या, विरोधकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 06:30 PM2018-06-06T18:30:38+5:302018-06-06T18:30:38+5:30
गोव्यातील विद्यमान भाजपाप्रणीत आघाडी सरकारमधील मंत्री एका पाठोपाठ आजारी पडू लागल्याने विरोधकांनी सरकारविरुद्ध नव्याने रान उठविणे सुरू केले आहे.
पणजी : गोव्यातील विद्यमान भाजपाप्रणीत आघाडी सरकारमधील मंत्री एका पाठोपाठ आजारी पडू लागल्याने विरोधकांनी सरकारविरुद्ध नव्याने रान उठविणे सुरू केले आहे. मुख्यमंत्री, वीजमंत्री वगैरे इस्पितळात आहेत तर ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे विदेश दौ-यावर गेले आहेत. अशा वेळी राज्यपालांनी पूर्ण सरकारलाच आजारी रजा मंजूर करावी, अशी मागणी विरोधकांनी सुरू केली आहे.
यापूर्वी काँग्रेसने राज्यपालांना निवेदन सादर करून सरकार बरखास्त करण्याची मागणी केली होती. आपण बहुमत सिद्ध करू शकतो, असा दावा काँग्रेसने करून मुख्यमंत्री दीर्घकाळ अमेरिकेत असल्याने प्रशासन ठप्प झाले आहे, अशी टीका काँग्रेसने केली होती. मुख्यमंत्री विदेशातून जूनच्या अखेरीस परततील असे सांगितले जाते. पण त्याबाबत निश्चित अशी माहिती नाही असे काही मंत्र्यांचे म्हणणे आहे. वीज मंत्री पांडुरंग मडकईकर यांना सोमवारी ब्रेन स्ट्रोकचा झटका आला. ते मुंबईच्या कोकिळाबेन इस्पितळात उपचार घेत आहेत. ते अजूनही अतिदक्षता विभागात आहेत. नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा हे मध्यंतरी अडीच महिने उपचारांसाठी विदेशात राहिले होते. त्यांच्याही आरोग्याविषयी प्रश्न आहेत. ते आता पोर्तुगालच्या दौ-यावर गेले आहेत. सध्या मंत्री विजय सरदेसाई, सुदिन ढवळीकर, विश्वजित राणे, रोहन खंवटे, माविन गुदिन्हो अशा चार-पाच मंत्र्यांकडूनच सरकार चालविले जात आहे.
अन्य मंत्र्यांची कामेही होत नाहीत. ते पर्रीकर कधी परततील हे पाहण्यासाठी थांबले आहेत. पर्रीकर आल्यानंतरच आपली कामे होतील असे दोघा-तिघा मंत्र्यांना वाटते. दरम्यान, जे मंत्री आजारी आहेत, त्या सर्वांना राज्यपालांनी रजा द्यावी जेणेकरून त्यांना लवकर बरे होऊन मग कामावर येता येईल, असे आम आदमी पक्षाचे निमंत्रक एल्विस गोम्स बुधवारी म्हणाले. एखादा सरकारी कर्मचारी आजारी पडल्यानंतर त्यास डॉक्टर रजा व विश्रांती घेण्याचा सल्ला देतात. सध्या सरकारमधील आजारी सेवकांनी (मंत्र्यांनी) रजा घ्यावी. ते आजारातून लवकर बरे व्हावे, असे आम्हाला वाटते. त्यांनी त्यांच्याकडील खात्यांचा व कामाचा ताबा दुस-यांकडे द्यावा, असे गोम्स म्हणाले.
सध्या प्रशासन ठप्पच झाले आहे. सरकार एका बाजूने नोकरभरती बंद करते व दुस-या बाजूने निवृत्त अधिका-यांना सेवावाढ देते. गोमंतकीय युवकांचे भवितव्य सरकार अंधारमय करत आहे, असे गोम्स म्हणाले. एका बिल्डरच्या सेवेसाठी वीज वाहिनी हलवून तिसवाडीला अंधारात ठेवल्याप्रकरणी टीकेचे केंद्र बनलेल्या वीज खात्याचे मुख्य अभियंते एन. रेड्डी यांना निवृत्तीनंतर सेवावाढ देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही गोम्स म्हणाले.