सहा इंडोनेशियन महिलांना गोवा सोडून जाण्याची नोटीस, व्हिसाचे उल्लंघन केल्याचा ठपका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 05:45 PM2018-09-25T17:45:00+5:302018-09-25T17:46:28+5:30
एका औषधाच्या आस्थापनात स्पा प्रशिक्षक म्हणून व्हिसा मिळवून प्रत्यक्षात गोव्यात एका सलूनमध्ये मसाज पार्लरचे काम करणा-या सहा इंडोनेशियन महिलांना देश सोडून जाण्याची नोटीस एफआरआरओ विभागाने बजावली आहे.
मडगाव: एका औषधाच्या आस्थापनात स्पा प्रशिक्षक म्हणून व्हिसा मिळवून प्रत्यक्षात गोव्यात एका सलूनमध्ये मसाज पार्लरचे काम करणा-या सहा इंडोनेशियन महिलांना देश सोडून जाण्याची नोटीस एफआरआरओ विभागाने बजावली आहे. मात्र या नोटीसीला सदर महिलांतर्फे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले आहे.
गोवा पोलिसांच्या विदेशी क्षेत्रीय विभागाचा ताबा असलेले पोलीस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या सहाही इंडोनेशियन महिला भारतात अजंटा मेडिकल्समध्ये स्पा प्रशिक्षक म्हणून नोकरीच्या व्हिसावर आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात त्या पणजी येथील ‘स्नीप सलून्स स्पा’मध्ये मसाज करण्याचे काम करत होत्या.
या सहाही महिलांनी व्हिसा परवान्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी विदेशी क्षेत्रीय नोंदणी अधिका-यांनी सध्या त्यांना देश सोडून जाण्याची नोटीस बजावली आहे. मात्र या नोटीसीला उच्च न्यायालयात दिलेल्या आव्हानावर शुक्रवारी 27 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.
पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणो, फेब्रुवारी ते मार्च 2018 मध्ये दर वर्षाला 25 हजार डॉलर्स या वेतनावर या महिलांना गोव्यात आणण्यात आले होते. विदेशी नागरिकांना भारतात आल्यावर 14 दिवसात एफआरआरओ कार्यालयात स्वत:ची नोंदणी करुन घेण्याची गरज आहे. मात्र मे महिन्यार्पयत यापैकी कोणीही आपली नोंदणी करुन घेतली नव्हती. मे 2018 मध्ये त्या नोंदणीसाठी या कार्यालयात आल्या असता दंड आकारुन त्यांची नोंदणी करण्यात आली. मात्र त्यावेळी त्यांनी आपल्या व्हिसांच्या अटींचे उल्लंघन केल्याचेही उघडकीस आले. यासंदर्भातील माहिती गृह व्यवहार मंत्रालयाला दिल्यानंतर या सर्वाना काळ्या यादीत टाकून 20 सप्टेंबर्पयत त्यांना देश सोडून जाण्याची नोटीस बजावली होती. सदर महिलांनी व्हिसा परवान्याचे उल्लंघन करण्याबरोबरच आयकर न भरल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.