खासगी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पुढील अधिवेशनात कायदा: आरोग्यमंत्री विश्वजित राणे 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 09:03 AM2024-08-19T09:03:26+5:302024-08-19T09:03:42+5:30

इस्पितळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे

legislation in next session to protect private doctors said health minister vishwajit rane  | खासगी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पुढील अधिवेशनात कायदा: आरोग्यमंत्री विश्वजित राणे 

खासगी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पुढील अधिवेशनात कायदा: आरोग्यमंत्री विश्वजित राणे 

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : सरकारी इस्पितळांबरोबरच खासगी इस्पितळांचे डॉक्टर्स, कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी वटहुकूम आणू किंवा पुढील विधानसभा अधिवेशनात कायदा आणू, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी स्पष्ट केले. इस्पितळांमध्ये आवश्यक सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे व्यवस्था केली जाईल, असे ते म्हणाले.

कोलकाता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार प्रकरणात देशभर डॉक्टरांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. राज्यातही निषेध म्हणून डॉक्टरांनी आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर मंत्री विश्वजित म्हणाले, 'कोलकातामधील घटना निंदनीय आहे. डॉक्टरांच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत. आरोग्यमंत्री म्हणून डॉक्टरांना माझा पाठिंबा आहे. केवळ सरकारीच नव्हे, तर गोव्यातील खासगी इस्पितळांचे डॉक्टर्स, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी लवकरच एकतर वटहुकूम आणला जाईल किंवा विधानसभेच्या पुढील अधिवेशनात विधेयक आणून कायदा केला जाईल.'

मंत्री म्हणाले की, 'डॉक्टर म्हणजे देव असे आम्ही मानतो. त्यांना संरक्षण देणे आमचे कर्तव्य आहे. राज्यातील महिला डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांना आवश्यक ती सर्व सुरक्षा देऊ. इस्पितळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी डॉक्टरांनी केली आहे, तीही पूर्ण केली जाईल.' विश्वजित राणे म्हणाले की, 'कोलकातामध्ये घडलेली घटना भयावह आहे. ममता बॅनर्जी यांनी निदान महिला मुख्यमंत्री म्हणून तरी या घटनेप्रती संवेदनशीलता दाखवायला हवी होती; परंतु दुर्दैवाने या घटनेचे राजकारण केले जात आहे.'

कोलकातामधील घटनेचा निषेध

दरम्यान, विश्वजित यांनी पश्चिम बंगालमध्ये एका निरपराध महिला डॉक्टरवरील बलात्काराचा तीव्र निषेध केला आहे. ते म्हणाले कि,' बलात्कार व त्यानंतर तिचा झालेला संशयास्पद मृत्यू या घृणास्पद गुन्ह्याचा मी तीव्र निषेध करतो. पीडित कटूंबाप्रती माझ्या संवेदना आहेत. ही शोकांतिका डॉक्टर्स तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा उपायांची तातडीची गरज अधोरेखित करते. ही घटना आपल्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना दररोज येणाऱ्या आव्हानांची आठवण करून देते. डॉक्टर इतरांना वाचवण्यासाठी आपले जीवन समर्पित करतात त्यांची सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करण्यासाठी आपण संघटित झाले पाहिजे.'

गरज भासल्यास आणखी सुविधा पुरवू : पाटील

दरम्यान, 'गोमेकॉ'चे अधीक्षक डॉ. राजेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सध्या तरी गोमेकॉत पुरेसे कॅमेरे आहेत. ३०० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. जानेवारी महिन्यात सर्व कॅमेरे तपासून पाहिले होते. या कॅमेऱ्यांमध्ये ६० दिवसांचा बॅकअप रेकॉर्ड राहतो. आणखी कॅमेरे बसवणार का? या प्रश्नावर डॉ. पाटील म्हणाले की, गोमेकॉच्या आवारात नवीन बांधकामे येत आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात अतिरिक्त कॅमेऱ्यांची गरज भासू शकते. तीनमजली नवीन 'लेक्चर हॉल' इमारत येत आहे. गरज भासेल तेथे आम्ही कॅमेरे बसवू,'

दरम्यान, गोमेकॉच्या अधिकाऱ्यांची अलीकडेच उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांशी बैठक झाली. गोमेकॉतील सुमारे ४६० सुरक्षा कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यासंबंधी चर्चा झाली. विशेष म्हणजे गोमेकॉतील ५० टक्के सुरक्षा कर्मचारी महिला आहेत. बाह्यरुग्ण विभाग तसेच गोमेकॉच्या अन्य विभागांच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांनाही गस्त घालण्याचे निर्देश दिले आहेत.

 

Web Title: legislation in next session to protect private doctors said health minister vishwajit rane 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.