गोव्यात लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका सत्ताधा-यांना नको, विरोधक मात्र तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2018 02:46 PM2018-02-03T14:46:22+5:302018-02-03T14:48:06+5:30

गोव्यात येत्या 2019 साली होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुका होतील अशा प्रकारची चर्चा असली तरी, सरकारला मात्र विधानसभा निवडणुका झालेल्या मुळीच नको आहेत.

Legislators do not have assembly elections with the Lok Sabha in Goa, the opponents are ready | गोव्यात लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका सत्ताधा-यांना नको, विरोधक मात्र तयार

गोव्यात लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका सत्ताधा-यांना नको, विरोधक मात्र तयार

Next

पणजी : गोव्यात येत्या 2019 साली होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुका होतील अशा प्रकारची चर्चा असली तरी, सरकारला मात्र विधानसभा निवडणुका झालेल्या मुळीच नको आहेत. मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाण्यास सरकार तयार नाही. विरोधात असलेल्या काँग्रेसने मात्र निवडणुका कधीही होऊ द्या, आम्ही तयार आहोत असे जाहीर केले आहे. गेल्या वर्षभरापूर्वी गोव्यात विधानसभा निवडणुका झाल्या व भाजपाचे केवळ चौदा उमेदवार निवडून आले.

आघाडी सरकार भाजपाला स्थापन करावे लागले. काँग्रेसकडे भाजपापेक्षा जास्त म्हणजे सोळा आमदार आहेत पण त्या पक्षाला विरोधी बाकांवर बसावे लागले. गेल्या निवणुकीत प्रत्येक मंत्री व आमदाराने जिंकून येण्यासाठी बराच खर्च केला आहे. त्यामुळे लगेच पुन्हा विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची कोणाचीच तयारी नाही व ते परवडणारेही नाही अशी प्रतिक्रिया काही आमदार व्यक्त करतात. स्वत: मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही मध्यावधी निवडणुका झालेल्या नको आहेत. भाजपाचे ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनाही पाच वर्षात आपण पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे असे वाटत नाही.

लोकांनी आम्हाला पाच वर्षासाठी निवडून दिले असताना आम्ही विधानसभेचा कालावधी कमी करून का म्हणून निवडणुकीला सामोरे जावे असा प्रश्न मंत्री डिसोझा विचारतात. गोव्यातील आघाडी सरकारमध्ये थोड्या कुरबुरी आहेत. जनमत कौल चळवळीत योगदान दिलेले स्व. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभा करण्याच्या विषयावरून भाजपा व गोवा फॉरवर्ड यांच्यात संघर्ष निर्माण झालेला असला तरी, त्याचा सरकारच्या स्थिरतेवर काही परिणाम होणार नाही. कारण गोवा फॉरवर्ड व भाजपालाही पाच वर्षासाठी सत्ता हवी आहे. लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका गोव्यात होणार ही केवळ अफवा असल्याचे अनेक मंत्र्यांचे म्हणणे आहे. 

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक व विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी या विषयाबाबत पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडली. आम्ही लोकसभा निवडणुकीला कधीही तयार आहोत. त्याचबरोबर आम्ही विधानसभा निवडणुकीला देखील सामोरे जाण्यास कोणत्याहीवेळी तयार आहोत, असे नाईक व कवळेकर यांनी सांगितले. तुम्ही लोकसभेसाठी उमेदवार ठरवलेले आहेत काय असे पत्रकारांनी विचारले असता, उमेदवारांच्या नावांविषयी अजून विचार झालेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Legislators do not have assembly elections with the Lok Sabha in Goa, the opponents are ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.