बिबट्या म्हणतोय... जंगल माझेच!; लोकांची उडतेय तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 03:35 PM2023-10-07T15:35:42+5:302023-10-07T15:36:39+5:30
कुंडई ते मडकई बगल रस्त्यावर वाढला वावर
लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : कुंडई ते मडकई येथील बगल रस्त्याच्या बाजूला झाडे झुडपे यांनी वेढलेल्या परिसरात काही दिवसांपासून एका बिबट्याचे सर्रास दर्शन होत आहे. बिबट्याचा या परिसरात वावर वाढल्यामुळे लोकांची मात्र तारांबळ उडाली आहे. बिबट्याची धास्ती वाढत असून रात्री-अपरात्री ये जा करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
दोन-तीन दिवसापूर्वी संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास बिबट्या एका दुचाकी मागे अचानक लागल्याचा प्रकार घडला होता. त्या नंतर या परसिरातील लोकांमध्ये भीती निमार्ण झाली आहे. हा परिसर डोंगराळ आणि निसर्ग रम्य असा असल्याने संध्याकाळच्या वेळी मावळणाऱ्या सूर्याचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने युवक-युवती वाहने घेऊन येथे येत असतात. तसेच कुंडई औद्योगिक वसाहत व मडकई औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारे काही कामगार सुद्धा याच रस्त्याने ये-जा करत असतात. मात्र, आता बिबट्याचा वावर वाढल्याने लोकांची वर्दळ कमी होत चालली आहे.
गेल्या काही दिवसात फोंडा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ कमी झाला होता. परंतु मडकई ते कुंडईच्या बगल रस्त्यावर बिबट्या नजरेस पडत असल्याने वन खात्याने लक्ष देण्याची मागणी वाहन चालक व ह्या परिसरात निसर्ग सौंदर्य न्याहळण्यासाठी येणाच्या लोकांनी केली आहे.
अजूनपर्यंत जरी बिबट्याने कुणावर हल्ला केला नसता तरी भविष्यात हा प्रकार होण्याची शक्यता आहे. येथून जाणाया लोकांना सुद्धा बिबट्यामुळे धोका निर्माण झाला आहे. परिसरात एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी वन खात्याने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी वाहन चालक करीत आहेत.
दुचाकीचा पाठलाग
सीमेपाईण म्हार्दोळ येथे वरच्या बाजूने असलेल्या बगल रस्त्यावर दोन-तीन दिवसांपूर्वी एक बिबट्या दुचाकीच्या मागे धावून गेल्याने चालकाने जीव मुठीत घेऊन स्वतःचा बचाव केला. बिबट्यापासून सुरक्षित राहिलेला दुचाकी चालक गोमेकॉतून संध्याकाळी घरी जात होता. त्यावेळी अचानक रस्त्यावर बिबट्या दिसून आला होता. सीमेपाईण भागातील अनेक लोकांचे पाळीव कुत्रे गेल्या काही दिवसात गायब झाले आहेत. त्यामुळे बिबट्या कुत्र्याच्या शोधात परिसरात फिरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.