गोव्यातील प्रश्नांकडे ब्रिक्सने लक्ष द्यावे, 1 ऑक्टोबरपासून जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2016 08:44 PM2016-09-28T20:44:08+5:302016-09-28T20:44:08+5:30
ब्रिक्स परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी गोवा व गोव्याबाहेरील सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले आहेत.
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 28 - गोव्यातील जनजीवनावर विविध प्रकारे होत असलेले परिणाम, येथील अनुसूचित जमातींची स्थिती, पर्यावरणाची हानी, पर्यटनातून येणारे दुष्परिणाम, सरकारच्या विकास मॉडेलचा मच्छीमारांवर होणारा परिणाम, महिलांमधील असुरक्षितता व अन्य तत्सम प्रश्नांकडे ब्रिक्स परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी गोवा व गोव्याबाहेरील सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले आहेत. त्यांनी पिपल्स फोरम ऑन ब्रिक्स ही संस्था स्थापन केली आहे.
आल्बेर्टिना आल्मेदा, सॅबिना मार्टीन्स आदी फोरमच्या पदाधिका-यांनी मिळून बुधवारी येथे पत्रकार परिषद घेतली. येत्या महिन्यात गोव्यात होत असलेल्या ब्रिक्स परिषदेत अनेक देशांचे प्रमुख सहभागी होतील. ते आंतरराष्ट्रीय विषयांबाबत चर्चा करतील पण त्यांना गोव्यातीलही स्थिती कळावी म्हणून ब्रिक्सपूर्व विविध कृतीसत्रंचे आयोजन पिपल्स फोरम ऑन ब्रिक्सतर्फे करण्यात आले असल्याचे आल्मेदा यांनी सांगितले.
गोव्यातील जमाती, त्यांची स्थिती व अन्य जातींतील लोकांना मिळणारी वागणूक, पक्षपात व अन्य विषयांवर प्रकाश टाकणा:या छायाचित्रंचे प्रदर्शन 1 ऑक्टोबर रोजी येथील टी. बी. कुन्हा सभागृहात दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत होणार आहे. गोव्याचे आधुनिकीकरण होत असताना अनुसूचित जमातीतील लोकांचाही विचार व्हावा असे अपेक्षित आहे, असे आल्मेदा म्हणाल्या.
पर्यटनाचे खासगीकरण या विषयावर 3 रोजी दुपारी अडीच ते पाच या वेळेत कारिटास हॉलिडे होमच्या सभागृहात चर्चासत्र होईल. लोकांच्या जीवनावरील अर्निबध पर्यटनाचा परिणाम, अपुरी संसाधने अशा विषयांवर प्रकाश टाकला जाईल. 7 ऑक्टोबर रोजी मायनिंग, मोपा विमानतळासारखे मेगा प्रकल्प व अन्य विषयांशीनिगडीत पिपल्स रिसोर्सिस, पिपल्स अॅसर्शन हा परिसंवाद होईल. 12 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता गोवा बँक कर्मचारी संघटनेचा परिसंवाद होईल. 12 रोजी ब्रिक्स परिषदेसाठी महिलांचा अजेंडा या विषयावर चर्चा होईल. बायलांचो सादतर्फे या परिसंवादाचे आयोजन केले जाईल. महिलांवर होत असलेले अन्याय, अत्याचार याविषयी त्यात चर्चा अपेक्षित आहे.