स्वयंपूर्ण, पर्यावरणपूरक चतुर्थी साजरी करूया; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2024 03:37 PM2024-09-02T15:37:02+5:302024-09-02T15:38:18+5:30
भावनिक आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समस्त गोमंतकीय जनतेला केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण गोवाची हाक देणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावर्षीच्या गणेश चतुर्थीसाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नको. तसेच प्लास्टिक फुलांची सजावट, माटोळीचे साहित्य प्लास्टिकचे वापरू नका. पर्यावरणपूरक नैसर्गिक सजावट करा, शाडू मातीपासून बनविलेल्या गणेश मूर्तीची पूजा करा. तसेच फराळ व मिठाई देखील घरीच बनवा, अशा प्रकारचे भावनिक आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समस्त गोमंतकीय जनतेला केले आहे.
गणेश चतुर्थीला सात दिवस शिल्लक असताना मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण जनतेला निसर्ग, पर्यावरण, आपली संस्कृती जपण्याचे आवाहन केले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नव्हे, तर शाडू मातीपासून गणेशमूर्तीचे पूजन घरोघरी करावे. तसेच माटोळीला लागणारे साहित्य प्लास्टिकचे न वापरता डोंगर माथ्या निसर्गाने भरभरून दिलेला सृष्टीतील पर्यावरणपूरक खजाना, फळांचा वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
सरकार वेगवेगळ्या प्रकारचे कायदे करते, तसेच अंमलातही आणले जातात. त्यासाठी प्रत्येक गोमंतकियाने जर निर्धार केला तर अनेक कायदे व अटी, नियमांची गरज भासणार नाही. प्रत्येकाने आत्मनिर्भर स्वयंपूर्णतेचा ध्यास घेऊन यावर्षीच्या गणेशोत्सवापासून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करताना ११ दिवस आनंदात पर्यावरणाच्या साथीने हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
बाजारात येणारी भेसळयुक्त मिठाई तसेच प्लास्टिक व इतर बाबतीत सर्वांनी खबरदारी घेऊन पर्यावरण पूरक सण साजरा करा. आपल्या महान संस्कृतीचा वारसा जपणारी निसर्गदेवता गणरायाच्या सेवेसाठी पूर्णपणे नतमस्तक होऊन स्वयंपूर्ण गणेश चतुर्थी साजरी करा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समस्त गोमंतकियांना एका निवेदनाद्वारे केले आहे.
विसर्जनानंतर निर्माल्य नदीत फेकू नका, तर त्याचा योग्य पद्धतीने निचरा करा. नितळ सुंदर स्वच्छ गोवा ठेवणे हे प्रत्येक गणेश भक्ताचे कर्तव्य आहे. त्याचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केले आहे.