संघटित लढून न्याय मिळवूया: जीत आरोलकर, मुंडकारप्रश्नी बैठकीला प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 09:36 AM2023-11-06T09:36:49+5:302023-11-06T09:37:18+5:30
जीत आरोलकर यांनी कुळ मुंडकार जनजागृती कार्यक्रमात केले.
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : कूळ, मुंडकार हक्क हा पेडणे तालुक्यातील बहुजन समाजासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. पेडणे तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन लढा देण्याची आवश्यकता आहे. पूर्वजांनी पिढ्यान्पिढ्या सांभाळून ठेवलेली जमीन प्रत्येकाने आपल्या नावावर करणे आवश्यक आहे. कूळ, मुंडकारांना न्याय मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही. उदरगत संस्थेमार्फत लोकांना मोफत वकील देण्यात येईल, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी तुये येथील कुळ मुंडकार जनजागृती कार्यक्रमात केले.
आयोजित केलेल्या बैठकीत आमदार आरोलकर बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशांवकर, तुयेच्या सरपंच सुलक्षणा नाईक, प्रवीण कळंगुटकर, माजी आमदार परशुराम कोटकर, तारा हडफडकर, अॅड. प्रसाद शहापूरकर, धारगळचे सरपंच अर्जुन कानोळकर, दयानंद मांद्रेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य श्रीधर मांद्रेकर, उमेश गाड, राजन कोरगावकर, अॅड. प्रसाद शहापुरकर, भास्कर नारूलकर आणि जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर, माजी आमदार परशुराम कोटकर तसेच सल्लागार समितीचे सदस्य असलेल्या वकिलांनी उपस्थित लोकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
आमदार आरोलकर म्हणाले की, पेडणे तालुक्यात साकारलेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळामुळे पेडणेतील जमिनीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच परप्रांतीयांकडून पेडणेतील जमिनी विकत घेण्यात येत आहेत. मात्र कुळांना विश्वासात न घेताच भाटकार परस्पर विकत आहेत. त्यामुळे कूळ आणि मुंडकारांवर अन्याय होत आहे. त्यासाठीच हा सर्वपक्षीय लढा उभारण्यात आला असून याला बहुजन समाजाचे नेते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सहकार्य आहे. कूळ मुंडकारांचा प्रश्न सोडविण्यासाठी पेडणेत फास्ट ट्रॅक पद्धतीने सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आहे. हा लढा उभारण्यासाठी सर्वांनी संघटित होऊया, त्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन आरोलकर यांनी केले. माजी आमदार परशुराम कोटकर म्हणाले, सरकारमध्ये असलेल्या एकाही आमदाराचे त्यांना सहकार्य नाही, यासारखे दुर्दैव नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.