म्हणे मुख्यमंत्रिपद सांभाळू; मंत्र्यांच्या विधानाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2024 10:00 AM2024-07-11T10:00:09+5:302024-07-11T10:01:11+5:30

गोव्यात व देशात इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जमाना सुरू झाल्यानंतर सर्वांचे चेहरे वारंवार टीव्हीवर दिसू लागले.

let hold the post of chief minister | म्हणे मुख्यमंत्रिपद सांभाळू; मंत्र्यांच्या विधानाची चर्चा

म्हणे मुख्यमंत्रिपद सांभाळू; मंत्र्यांच्या विधानाची चर्चा

मीडियावाले समोर दिसले की न राहवून सगळे काही बोलून टाकायचे अशी अवस्था काही राजकारण्यांची होत असते, - कळंगुटचे आमदार मायकल लोबो व कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांच्याबाबतीत अनेकदा असे घडते. मनात जे काही विचार येतात ते सगळे पत्रकारांसमोर व्यक्त करायचे, अशी सवय काही आमदारांना झालेली आहे. 

गोव्यात व देशात इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जमाना सुरू झाल्यानंतर सर्वांचे चेहरे वारंवार टीव्हीवर दिसू लागले. अनेकांना आपली छबी सतत दिसत राहावी असे वाटते. त्यातून मग वाट्टेल ती विधाने केली जातात. मात्र, काहीवेळा ही विधाने बेक फायर होतात, म्हणजे आपल्यावरच उलटतात याचे भान रवी नाईक यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यालादेखील राहत नाही. सोमवारी नीलेश काब्राल किंवा कृषिमंत्री रवी नाईक यांनी जी विधाने केली त्यावर राज्यात चर्चा सुरू आहे.

काब्राल जे काही बोलते ते तर थोडे गंभीर व थोडे विनोदी स्वरूपाचे आहे. काब्राल यांच्या विधानाचे टायमिंग पाहिले की, गांभीर्य कळून येते. मुख्यमंत्रिपददेखील स्वीकारण्याची माझी तयारी आहे, असे सांगून काब्राल मोकळे झाले. मीडियाने मला विचारले म्हणून मी बोललो, मी प्रमोद सावंत यांना कमकुवत म्हणत नाही किंवा त्यांना पद सांभाळता येत नाही, असाही माझा दावा नाही असे स्पष्टीकरण काब्राल यांनी दिले आहे. मात्र, मुख्यमंत्रिपद दिले तरी मी स्वीकारीन, माझ्याकडे कोणत्याही पदावर काम करून दाखविण्याची क्षमता आहे, असे काब्राल बोलले. अर्थात काब्राल यांच्या क्षमतेविषयी कुणाला शंका नाही. ते आपण मरिन इंजिनिअर आहोत, असे वारंवार बोलूनही दाखवितात. काब्राल मंत्रिपदी होते तेव्हा त्यांची क्षमता गोव्याला कळलीच, पण गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी ते भाजपला अपेक्षेएवढी मते कुडचडे मतदारसंघात देऊ शकले नाहीत; हीदेखील वस्तुस्थिती आहे. 

काब्राल कार्यक्षम आहेत याबाबतही वाद नाही. मात्र, मुख्यमंत्रिपददेखील स्वीकारण्यास आपण तयार आहोत, असे विधान जाहीरपणे करायचे नसते हे काब्राल यांना कळायला हवे होते, जेव्हा मंत्रिमंडळ फेररचनेची चर्चा सगळीकडे सुरू आहे आणि त्याबाबतच्या बातम्या झळकतात, त्यावेळी सीएमपददेखील आपण हाताळू शकतो असे सांगणे हा बालिशपणा झाला. यातून काब्राल मुख्यमंत्री सावंत यांनाही दुखवत आहेत, असा अर्थ काहीजण काढू शकतात. मुळात गेल्यावेळी कानाल यांचे मंत्रिपद मुख्यमंत्र्यांनीच काढून घेतले व आलेक्स सिक्वेरा यांना त्या पदावर आणले. सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकरीसाठी काही उमेदवारांची नावे मुख्यमंत्र्यांनीही काब्राल यांच्याकडे दिली होती, पण काब्राल यांनी त्यापैकी काही नावे मान्यच केली नाहीत. त्यांना नोकरी दिली नाही. हा देखील सावंत व काब्राल यांच्या संघर्षातील एक महत्त्वाचा मुद्दा ठरला होता. तो संघर्ष अजून पूर्णपणे संपलेला नाही.

सोमवारी मुख्यमंत्र्यांनी सर्व सत्ताधारी आमदारांची बैठक घेतली. काब्राल आणि मायकल लोबोही होते. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत स्पष्टपणे सर्वांना बजावले की, मीडियाशी जाहीरपणे काही विषयांवर बोलू नका. तुम्ही सरकारच्या विरोधात आहात असे दाखवून देऊ नका, तुमची विधाने लोकांमध्ये तसा समज निर्माण करतात, असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत नमूद केले होते. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी आमदार लोबो यांचे नावदेखील घेतले. आसगाव घर मोडतोडप्रकरणी आपण पोलिस निरीक्षकाला सेवेतून निलंबित केले, त्या अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत घ्या, अशी जाहीर मागणी लोबो यांनी करायला नको होती. लोबो यांनी माझ्याकडे येऊन मागणी मांडायला हवी होती, असे मुख्यमंत्र्यांनी सुचविले. काब्राल यांनी मुख्यमंत्र्यांच्या या सल्ल्यातून काही धडा घेतला नाही. बैठक होऊन पंधरा मिनिटे झाली नाहीत तोवर काब्राल यांनी तोंड उघडले आणि आपण सीएमपददेखील सांभाळू शकतो असे विधान केले. अर्थात भाजपमधील बेशिस्त अलीकडे सर्वच आघाड्यांवर दिसून येत आहे.

गोवेकर पेटून उठले तर गोव्यात जमिनी विकत घेणाऱ्या दिल्लीकरांना पळून जावे लागेल, असे विधान मंत्री रवी नाईक यांनी काल केले. रवी अलीकडे फारच विनोद करतात. मंत्रिमंडळात विनोदवीर, माफीवीर आणि पैसेवीर असे सगळेच आहेत. त्यामुळेच मंत्रिमंडळाची फेररचना होणे गरजेचे आहे असे
आता लोकांनादेखील वाटते.

Web Title: let hold the post of chief minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.