वाहतूक सेंटिनल योजनेवर विचार करू : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 07:17 PM2019-07-16T19:17:52+5:302019-07-16T19:18:33+5:30
राज्यातील 101 ट्रॅफिक सेन्टीनल व्यक्तींना सरकार अजून 29 लाख 27 हजार रुपयांची बक्षिस रक्कम देणे आहे. ही योजना सरकारने बंद केलेली नाही. ती चालू आहे. तथापि, या योजनेवर विचार केला जाईल
पणजी - राज्यातील 101 ट्रॅफिक सेन्टीनल व्यक्तींना सरकार अजून 29 लाख 27 हजार रुपयांची बक्षिस रक्कम देणे आहे. ही योजना सरकारने बंद केलेली नाही. ती चालू आहे. तथापि, या योजनेवर विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.
प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नाडिस यांनी याबाबतचा प्रश्न मांडला होता. ही योजना लोकांना तापदायक ठरत असल्याने ती रद्द केली जावी, असे फर्नाडिस यांचे म्हणणे होते. सरकार अगोदरच कायदेशीर पद्धतीने अनेक लोकांना देणो असते, त्यात आणखी ही योजना का म्हणून आहे, ती बंदच करा, असे आमदार चर्चिल आलेमाव हेही म्हणाले. वाहतूक सेंटिनल योजनेखाली कुणाला वारंवार बक्षिस मिळाले ते सांगा, असा आग्रह काणकोणचे आमदार इजिदोर फर्नाडिस यांनी धरला. वाहतूक सेंटिनल योजनेचा फेरआढावा घेण्यासाठी व लोकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी समिती नेमण्याचे आश्वासन सरकारने यापूर्वी विधानसभेत दिले होते. त्याविषयी पुढे कोणती पाऊले उचलली गेली, अशी विचारणा मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली.
उत्तरादाखल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की ही योजना सुरू राहील, पण सरकारने जर आश्वासन दिले होते, तर मग आपण या योजनेवर व आश्वासनाविषयी विचार करीन. राज्यातील एकूण 7 हजार 387 नागरिक वाहतूक सेंटिनल झालेले आहेत. नागरिकांनी तशी स्वत:ची नोंद केली आहे. 165 व्यक्तींना सरकारने आतापर्यंत 37 लाख 81 हजार रुपयांची बक्षिस रक्कम दिलेली आहे. अजून 29 लाख 27 हजार रुपये देणे आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.