किनारी भागातील गैरसोयी दूर करू
By admin | Published: May 18, 2017 02:26 AM2017-05-18T02:26:55+5:302017-05-18T02:28:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कपेडणे : पेडणे तालुक्यांतील मोरजी, मांद्रे, हरमल व केरी-तेरेखोल या किनारी भागात कोणत्याही गैरसोयी दूर झाल्या नाहीत. स्वच्छतागृहांसह
लोकमत न्यूज नेटवर्क
पेडणे : पेडणे तालुक्यांतील मोरजी, मांद्रे, हरमल व केरी-तेरेखोल या किनारी भागात कोणत्याही गैरसोयी दूर झाल्या नाहीत. स्वच्छतागृहांसह सर्व सोयीसुविधा आगामी काळात पूर्ण केल्या जातील, असे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. शहरातील पर्यटक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात यावेत यासाठी नवीन पर्यटनस्थळे विकसित केली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. किनारी भागात बेकायदा व्यवहारांना मुळीच थारा दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सध्या पेडणे तालुक्यातील पर्यटन हंगाम संपुष्टात आला असून साहित्याचे पॅकिंग सुरू आहे. विदेशी पर्यटकांना आपल्या देशात परतीचे वेध लागले आहेत, त्यामुळे अनेक पर्यटन हंगामातील किनारी कुटिरे रेस्टॉरंट बंद केली आहेत. प्लास्टिक आच्छादने घालून आपला व्यवसाय बंद केला तो नवीन पर्यटन हंगाम येण्याची प्रतीक्षा करण्याच्या आशेने, तर काही जणांनी जागा आरक्षित करून आतापासूनच बांधकामे करून पुढच्या हंगामात व्यवसाय थाटण्याच्या दृष्टीने कामालाही सुरुवात केली आहे.
किनारे सुने-सुने
विदेशी पर्यटक परतीकडे निघाल्याने किनाऱ्यांवर गर्दी कमी दिसते. किनारे सुने-सुने वाटतात. काही खासगी जागेतील रेस्टॉरंटमध्ये काही पर्यटकांची वर्दळ दिसते ती केवळ समुद्रस्नानासाठी. समुद्रस्नान केल्यानंतर महिलांना कपडे बदलण्यासाठी कोणतीच सोय नसल्याने नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. आंघोळीसाठी दरवर्षी पिर्ण येथून येणाऱ्या ज्योती परब यांनी सांगितले की, आपण दरवर्षी मोरजी किनारी औषधी खाऱ्या पाण्याच्या आंघोळीसाठी येते. दरवर्षी किनाऱ्याचा चेहरा-मोहरा बदललेला असतो. मात्र, आजपर्यंत कोणतीच सोय नसल्याने आमचे हाल होतात. आमचे नातलग जवळच किनारी भागात असल्याने तेवढी अडचण येत नाही. मात्र, इतरांना विशेषत: जी अडचण येते, ती शब्दांत सांगता येत नाही.
दरम्यान, किनारी भागात पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी ते संपेपर्यंत मोरजी, आश्वे-मांद्रे व हरमल या भागात राजरोसपणे बेकायदा संगीत रजनी आयोजित करून स्थानिकांना त्रास दिला जातो. अनेक लेखी
तक्रारी करूनही आजपर्यंत
एकावरही कारवाई झाली नाही, त्यांच्या विरोधात तक्रारी करूनही गुन्हा नोंद केला नाही.