कायदा हाती घेणाऱ्यांना रासुका लावू, आयजीपींचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 08:08 PM2020-06-22T20:08:13+5:302020-06-22T20:08:34+5:30
सांताक्रूझ टोळी युद्ध हे दोन गटातील वैमन्यासातून झाले असले तरी त्याचा त्रास लोकांना झालेला आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांना कडक कारवाई करण्याचा इशारा मुख्यालयातून देण्यात आला आहे.
पणजी: कायदा हाती घेणाऱ्यांविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली (रासुका) कारवाई करण्याचा इशारा पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी दिला आहे. सांताक्रूझ गँगवॉरनंतर झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
सांताक्रूझ टोळी युद्ध हे दोन गटातील वैमन्यासातून झाले असले तरी त्याचा त्रास लोकांना झालेला आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांना कडक कारवाई करण्याचा इशारा मुख्यालयातून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांच्या झालेल्या एका तातडीच्या बैठकीत रासुका लागू करण्यासंबंधी चर्चा झाली. कायदा सुव्यवस्था बिघडवू पाहणा-यांविरुद्ध गरज पडल्यास रासुका लावण्याचा पर्यायही पोलीस खात्याने खुला ठेवला आहे.
या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तबही झाल्याची माहिती पोलीस मुख्यालयानेच जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. शिवाय, गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्यांची यादी करून त्यांना तडीपार करण्याचीही प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.
एकूण 13 टोळी युद्धवाल्यांना अटक
पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईत सांताक्रूझ टोळी युद्धातील संशयित नागोवा येथील सर्वेश दिवकर, व्हडलें भाट येथील यासीन नामक युवक, करंजाळे येथील साहील नामक युवकाला तसेच, सांताक्रूझ येथील जयेश नामक युवकाला अटक करण्यात आली. या चार जणांना अटक करण्यापूर्वी टोळी युद्धाच्या दिवशी 9 जणांना अटक करण्यात आली होती. शिवाय दोघे अल्पवयीनही या प्रकरणात आढळले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता 13 झाली आहे. आणखी किमान 4 जण दडून बसल्याचा संशय पोलिसांना आहे.