म्हादई प्रश्नी गोवा शिवसेनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र; मुख्यमंत्र्यांची ‘बॅड सांताक्लॉज’ अशी संभावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 18:37 IST2017-12-25T18:37:33+5:302017-12-25T18:37:46+5:30
म्हादईच्या प्रश्नावर गोवा प्रदेश शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची ‘बॅड सांताक्लॉज’, अशी संभावना केली आहे.

म्हादई प्रश्नी गोवा शिवसेनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र; मुख्यमंत्र्यांची ‘बॅड सांताक्लॉज’ अशी संभावना
पणजी : म्हादईच्या प्रश्नावर गोवा प्रदेश शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची ‘बॅड सांताक्लॉज’, अशी संभावना केली आहे. म्हादईचे पाणी कर्नाटकला देण्याची भूमिका घेऊन पर्रीकरांनी गोव्यातील नव्या पिढीचे भवितव्यच हिसकावून घेतले असल्याची टीका त्यांनी पत्रात केली आहे.
पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या राखी नाईक यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या या पत्रात असे म्हटले आहे की, सांता क्लॉज नाताळात लहान मुलांना चॉकलेट देतो. मुलांच्या चेह-यावर हास्य पसरावे, ती आनंदित व्हावी यासाठी सांता क्लॉज हे सर्व करीत असतो. गोव्यात सांता क्लॉजरुपी पर्रीकरांनी म्हादईचे पाणी कर्नाटकला देऊ करुन त्यांचे भवितव्यच हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. नदी ही नैसर्गिक देणगी आहे. तिचा वापर गोव्यातील जनतेसाठीच व्हावा. कोणीही राजकारणासाठी या जलस्रोताचा वापर करु नये.
म्हादईचे पाणी कर्नाटकला देण्याबाबत बोलणी करण्याची तयारी गोवा सरकारने दाखवलेली आहे त्यावर राज्यातील जनमानसात प्रचंड असंतोष आहे. सरकारमध्ये घटक असलेले गोवा फॉरवर्ड तसेच मगोपनेही नाराजी दर्शविली आहे. रविवारी मगोपच्या आमसभेत गोवा सरकारने कर्नाटकशी या प्रश्नावर बोलणी करुच नये, अशा मागणीचा ठराव घेतला. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात म्हादईच्या प्रश्नावर वातावरण तापत चालले आहे.
पत्र लवादाला लिहायला हवे होते : सिध्दरामय्या
दरम्यान, दुसरीकडे म्हादईच्या प्रश्नावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कर्नाटकचे भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांच्याऐवजी लवादाला पत्र लिहायला हवे होते, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दारामय्या यांनी म्हटले आहे. लवादानेच तिन्ही राज्यांनी एकत्र बसून तोडगा काढावा, असे सूचविले होते त्यामुळे पर्रीकर यांनी लवादाला पत्र लिहायला हवे होते, असे सिध्दारामय्या कर्नाटकात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.२00२ साली केंद्र सरकारने म्हादईचे ७.५६ टीएमसी फूट पाणी पिण्यासाठी म्हणून वापरण्यास कर्नाटकला परवानगी दिली होती आणि आमचा दावाही तोच आहे, असे सिध्दरामय्या यांचे म्हणणे आहे.