माध्यान्ह आहारात अळ्याप्रकरणी सेल्फ हेल्प ग्रुपचा परवाना निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 12:36 PM2023-09-29T12:36:06+5:302023-09-29T12:36:49+5:30
सेल्फ हेल्प गटांचे बिलाचे पैसे प्रलंबित असल्याचा गोष्टीला मुख्यमंत्र्यांनी नकार दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: माध्यान्ह आहारात अळ्या आढळल्याच्या प्रकरणात आहार पुरवणाऱ्या संबंधित सेल्फ हेल्प ग्रुपचा परवाना एफडीएकडून निलंबित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की, सरकार असले प्रकार खपवून घेणार नाही. विद्यार्थ्यांना दर्जेदारच आहार मिळायला हवा त्यासाठीच अक्षयपत्रा सारख्या संस्थांना स्थान दिले गेले. जे सेल्फ हेल्प ग्रुप चांगला माध्यम आहार पुरवतात त्यांना सरकार हातही लावणार नाही. परंतु जे बेफिकीरपणा दाखवतात किंवा दर्जा राखत नाहीत त्यांच्यावर मात्र कारवाई केली जाईल. सेल्फ हेल्प गटांचे बिलाचे पैसे प्रलंबित असल्याचा गोष्टीला मुख्यमंत्र्यांनी नकार दिला. ते म्हणाले की, केवळ एका महिन्याचे बिल प्रलंबित आहेत. ते सरकारकडून मिळणार आहे.
दरम्यान, सावईवेरे, केरी भागात शाळांमध्ये माध्यान्ह आहारात अळ्या सापडल्याच्या पार्श्वभूमीवर बाल हक्क आयोगाने शिक्षण खात्याला नोटिस बजावली आहे. या प्रकरणात अन्न व औषध प्रशासन संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी अन्नाचे नमुने गोळा केले आहेत. 'पुलांव'मध्ये अळ्या सापडल्याची तक्रार आहे. 'हा निव्वळ दुर्लक्षाचा प्रकार असून धक्कादायक आहे. गुणवत्तेची खात्री करण्यासाठी राज्य, जिल्हा तसेच स्थानिक पातळीवर विस्तृत निरीक्षण यंत्रणा असूनही हा प्रकार घडावा हे धक्कादायक असल्याचे आयोगाचे अध्यक्ष पीटर एफ. बोर्जीस यांनी म्हटले आहे.