एलआयसीच्या जीवन शांती पेन्शन प्लॅनला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 01:19 PM2018-09-20T13:19:49+5:302018-09-20T13:20:43+5:30
आयुर्विमा महामंडळाच्या जीवन शांती पेन्शन प्लॅनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे
पणजी : आयुर्विमा महामंडळाच्या जीवन शांती पेन्शन प्लॅनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १२ सप्टेंबर रोजी हा प्लॅन खुला केल्यानंतर पहिल्याच दिवशी देशभरात १०,०००जणांनी पॉलिसी उतरविल्या आहेत. महामंडळाला यातून ४१ कोटी रुपये मिळाल्याची माहिती एलआयसीच्या गोवा विभागाचे ज्येष्ठ व्यवस्थापक राजेश मिध्दा यांनी दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना मिध्दा म्हणाले की, गोव्यातही पहिल्याच दिवशी ४८ जणांनी पॉलिसी उतरविल्या व त्यातून १ कोटी ८४ लाख रुपये या विभागाला मिळाले. आज चांगल्या वैद्यकीय सुविधा असल्याने माणसाचे आयुष्यमान सरासरी ७५ ते ८० वर्षांवर पोचले आहे. १९४७ साली सरासरी आयुष्यमान ४९ ते ५० वर्षे एवढेच होते. याआधी २००१ मध्ये जीवन अक्षय योजना आणली होती. नव्या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे एकूण रक्कम आणि व्याजही गृहीत धरून लाभ दिला जातो. ३१ मार्च २०१९ पर्यंत गोव्यात किमान २०० कोटी रुपयांचा व्यवसाय या नव्या प्लॅनद्वारे करण्याचा करण्याचे उद्दिष्ट आहे.
१९ टक्क्यांपर्यंत लाभ या पेन्शन योजना योजनेतून मिळू शकतो. बँकाही एवढे व्याज देत नसल्याचे मिध्दा म्हणाले. अलीकडची महागाई वाढली पाहता पेन्शन महागाईच्या तुलनेत तेवढी वाढत नाही. त्यामुळे निवृत्तीनंतर लोकांना आर्थिक नियोजनाबाबत कसरत करावी लागते. जीवन शांती प्लॅन लोकांसाठी वरदान ठरलेला आहे. पहिल्याच दिवशी एवढा भरभरून प्रतिसाद देऊन लोकांनी एलआयसीवर मोठा विश्वास दाखवला आहे, असेही ते म्हणाले. आतापर्यंत गेल्या आठ दिवसात ५४ पॉलिसीधारक गोव्यात झालेले आहेत. गणेश चतुर्थीनिमित्त सर्वजण व्यस्त असल्याने थोडी मंदी होती. परंतु आता पुढील काळात जास्तीत जास्त प्रमाणात गोव्यात लोक आपल्या पॉलिसी उतरवतील, असे ते म्हणाले. गोवा विभागाचे १०८ एलआयसी विकास अधिकारी तसेच एकूण ३ हजार ७१५ कर्मचारी आहेत. नजीकच्या काळात आयुर्विमा महामंडळ आणखीही काही आकर्षक प्लॅन लोकांसाठी घेऊन येणार आहे, असे स्पष्ट करून मिध्दा म्हणाले की, जीवन अक्षय योजना सुरू केली तेव्हा १२ टक्के व्याज आम्ही आश्वासीत केले होते. त्याप्रमाणे आजतागायत आम्ही ते देत आहोत. मात्र बँका त्यावेळी १३ टक्के व्याज देत होते ते आता ५ टक्क्यांवर आलेले आहे. त्यामुळे एलआयसीमध्ये गुंतवणूक ही विश्वासार्ह असल्याची लोकांनाही खात्री पटलेली आहे. एलआयसी सरकारी रोखे किंवा तत्सम खात्रीशीर ठिकाणीच पैशांची गुंतवणूक करीत असते त्यामुळे लोकांचे पैसे सुरक्षित असतात आणि आम्ही परतावाही जास्तीत जास्त प्रमाणात देऊ शकतो, असे म्हणाले.
पत्रकार परिषदेत विभागीय उपसरव्यवस्थापक नकुल बेंद्रे, विपणन व्यवस्थापक अभय कुलकर्णी, निखिल बाम आदी उपस्थित होते. एक ते वीस वर्षांसाठी हा प्लॅन घेतला जाऊ शकतो तात्काळ लाभ किंवा मुदतीने लाभ अशा दोन पर्यायांची ग्राहक निवड करू शकतात. ऑनलाइन पॉलिसी घेतली जाऊ शकते. वैयक्तिक, संयुक्त किंवा दिव्यांगानाही या योजनेचा लाभ मिळू शकतो. वयाच्या ३० वर्षानंतर कोणत्याही व्यक्तीला ही पॉलिसी घेता येईल. मृत्यू झाल्यास पॉलिसीवर लाभ मिळेल.