सेल्फीची हौस घेतेय जीव!

By किशोर कुबल | Published: April 26, 2023 01:26 PM2023-04-26T13:26:36+5:302023-04-26T13:28:28+5:30

२०२० साली २४ धोकादायक ठिकाणे जाहीर करून तिथे सेल्फी घेण्यास मनाई केली. त्यात केरी, तेरेखोल किनाऱ्याचाही समावेश होता. तरीदेखील चौघे बुडालेच...

life is taking a selfie | सेल्फीची हौस घेतेय जीव!

सेल्फीची हौस घेतेय जीव!

googlenewsNext

किशोर कुबल, मुख्य प्रतिनिधी, लोकमत, पणजी

गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवर खडकांमध्ये सेल्फी काढण्याच्या नादात पर्यटकांनी जीव गमावण्याच्या दुर्दैवी घटना याआधीही अनेकदा घडलेल्या आहेत. वाढत्या दुर्घटनांनंतर २०२० साली राज्यातील २४ धोकादायक ठिकाणे जाहीर करून तिथे सेल्फी घेण्यास मनाई केली होती. परंतु या मनाईची अंमलबजावणी केली जात आहे की नाही, हा संशोधनाचा विषय आहे.

गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांवरील खडकांमध्ये जाऊन सेल्फी काढण्याच्या नादात आजवर अनेक पर्यटक जीव गमावून बसले आहेत. केरी, तेरेखोल येथे रविवारी घडलेली दुर्घटना तर स्थानिकांच्याच बाबतीत घडली. चार जणांना सेल्फीच्या नादात जीव गमवावा लागला. किनाऱ्यावर जीवरक्षकाचे काम करणाऱ्या दृष्टी लाइफ सेव्हिंग कंपनीने सुचविल्यानुसार जी २४ ठिकाणे धोकादायक जाहीर केली, त्यात केरी, तेरेखोलचाही समावेश होता. तिथे पर्यटकांना सावधानतेचा इशारा देणारे साइनबोर्ड लावलेले आहेत, असे पर्यटन खात्याचे म्हणणे आहे.

उत्तर गोव्यातील बागा, दोनापावला जेटी, सिकेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला खडकाळ भाग. हणजण वागातोर, मोरजी, आश्वे, हरमल, केरी, बांबोळी आणि शिरदोण किनाऱ्यांवरील खडकाळ भाग पर्यटकांना नेहमीच आकृष्ट करतो. दक्षिण गोव्यातील आगोंद, बोगमालो, होळांत, बायणा, सडा येथील जापानिझ गार्डन, बेतुल, खणगिणी, पाळोळे, खोला, काब द राम किल्ला, पोळे, गालजीबाग, तळपण व राजबाग ही ठिकाणेही सेल्फी निषिद्ध आहेत.

केरी, तेरेखोल येथे चार जण बुडाले तेव्हा जीवरक्षक काय करीत होते, असा एक प्रश्न उपस्थित केला जात आहे. परंतु जीवरक्षकांनी खबर मिळताच आपले काम चोख बजावल्याचा दावाही दुसरीकडून केला जात आहे. राज्यात दृष्टी कंपनीचे सुमारे ७०० जीवरक्षक आहेत. ते समुद्र किनाऱ्यावर पोहताना बुडणाऱ्यांना वाचविण्याचे काम करतात. आपत्कालीन सेवेसाठी दोन जीवरक्षक रात्री ८ वाजेपर्यंत जीवरक्षक टॉवरवर तैनात असतात. २००८ सालापासून जीवरक्षक तैनात आहेत. आजपावेतो ५ हजारांहून अधिक जणांचे प्राण वाचविण्यात आल्याचा दावा केला जातो.

गोव्यात अशा दुर्घटना का घडतात, असा प्रश्न पडतो. निसर्गाचे खुललेले रूप पाहण्यासाठी पर्यटक शेकडो किलोमीटरचे अंतर पार करूत पर्यटनस्थळ गाठतात. पर्यटनाचा आनंद घेण्यासोबतच बेशिस्त वर्तनही करतात. किनाऱ्यांवरील खडकांमध्ये निसरड्या जागेवर उभे राहून सेल्फी घेत मौजमजा करतात आणि ध्यानी मनी नसताना अचानक एखादी मोठी लाट येऊन त्यांना पाण्यात ओढते किंवा पाय घसरून तेच पाण्यात पडतात. धक्कादायक बाब म्हणजे संपूर्ण जगाच्या तुलनेत सेल्फी काढताना मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. 'सेल्फी' मृत्यूमध्ये भारतापाठोपाठ रशिया, अमेरिका आणि पाकिस्तानचा नंबर लागतो. सेल्फीचं अतिवेड वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातही घातक ठरू लागल्याचं दिसून येत आहे. पिकनिकची मजा लुटताना स्वतःची सुरक्षाही तेवढीच महत्त्वाची आहे. सर्वच सरकारवर सोडून चालणार नाही.

केरी येथील दुर्दैवी घटनेनंतर काँग्रेसने पर्यटनमंत्री राजीनामा देणार का? मुख्यमंत्री वाढदिवसाचे सोहळे रद्द करणार का? असे अनेक प्रश्न केले. किनाऱ्यावर येणाऱ्या प्रत्येकाच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची आहे, हे जरी खरे असले तरी तेवढीच जबाबदारी आपली स्वतःचीही आहे, हे नाकारून चालणार नाही. पर्यटन खाते समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते; पण दुर्दैवी घटना घडली तेव्हा जीवरक्षक आणि पर्यटक रक्षक कुठे होते, असा विरोधकांचा सवाल आहे. काँग्रेस पक्षाने वेळोवेळी किनाऱ्यावरील सुरक्षा, जीवरक्षक कंत्राट, किनारा सफाई कंत्राट घोटाळा उघड केला आहे. केरी बीचवर दुर्घटनेवेळी पुरेसे जीवरक्षक तैनात केले नव्हते, असाही आरोप केला जात आहे. या दुर्दैवी घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि समुद्रकिनारा सुरक्षा कंत्राटदाराने गोव्यातील विविध समुद्र किनाऱ्यांवर नेमलेले मनुष्यबळ आणि उपकरणे यांचे लेखापरीक्षण करावे, अशी मागणी केली जात आहे.

केरी दुर्घटनेनंतर पर्यटन खात्याने मंगळवारी नव्याने अँडव्हायझरी जारी केली. यात किनाऱ्यांवरील खडकाळ भागात सेल्फी काढू नये, असे स्पष्टपणे बजावले आहे, परंतु त्याचे पालन कितपत होते आणि पालन होते की नाही याची खातरजमा करण्याचे काम सरकारी यंत्रणा करणार आहे का? हे महत्त्वाचे प्रश्न आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: life is taking a selfie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा