नद्यांमधील गाळ उपसा
By Admin | Published: August 25, 2015 01:27 AM2015-08-25T01:27:32+5:302015-08-25T01:27:41+5:30
पणजी : गोव्यातील जुवारी, मांडवी, शापोरा अशा सर्वच नद्यांमध्ये खूप गाळ साचलेला आहे. हा गाळ उपसला जावा, अशी मागणी गोवा सरकारने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
पणजी : गोव्यातील जुवारी, मांडवी, शापोरा अशा सर्वच नद्यांमध्ये खूप गाळ साचलेला आहे. हा गाळ उपसला जावा, अशी मागणी गोवा सरकारने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
सोमवारी मंत्री गडकरी हे गोवा भेटीवर होते. गोवा सरकारने त्यानिमित्ताने गडकरी यांच्यासमोर काही प्रस्ताव ठेवले. यात महत्त्वाचा प्रस्ताव म्हणजे राज्यातील सर्व महत्त्वाच्या नद्या उपसण्याबाबतचा आहे, असे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी सांगितले.
जुवारी, मांडवी, शापोरा या नद्यांचे मुख अगोदर तातडीने उसपून द्या, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. राज्यात खनिज व्यवसाय सुरू होता, तेव्हा बार्जेस नद्यांमधून वाहतूक करत होत्या. बार्जमधील खनिज मातीही अनेक वर्षे या नद्यांमध्ये पडलेली आहे. त्यामुळे नद्यांची मुखे आणि पात्रेही बुजली आहेत, असा मुद्दा गडकरी यांच्यासमोर मांडण्यात आला. आता येत्या आॅक्टोबरमध्ये पुन्हा राज्यात नव्याने खनिज व्यवसाय सुरू होणार आहे. पुन्हा बार्जमधील माती नद्यांमध्ये सांडेल व पुन्हा नद्यांमधील गाळ वाढेल. हा गाळ काढण्यासाठी खर्च करण्याएवढा निधी राज्य सरकारकडे नाही व यंत्रसामग्रीही नाही याची कल्पना गडकरी यांना देण्यात आली. गडकरी यांनी केंद्र सरकार त्यासाठी मदत करील, असे राज्य सरकारला सांगितले. (खास प्रतिनिधी)