म्हादईसाठी मेणबत्ती, पणती, दिवे लावा; ‘सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’चे आवाहन, १६ रोजी महाआरती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 01:10 PM2023-02-07T13:10:05+5:302023-02-07T13:10:47+5:30
म्हादईसाठी गुरुवार, १६ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता पणजी येथील पाटो पुलावर महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: म्हादईच्या प्रती आदर दाखवण्यासाठी रविवार, दि. १२ रोजी गोमंतकियांनी आपल्या घरात संध्याकाळी ७:३० वाजता पणती, मेणबत्ती, दिवे लावावेत व सरकारला 'म्हादई वाचवा' असा कठोर संदेश द्यावा, असे आवाहन 'सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा' या संघटनेने केले आहे.
याशिवाय म्हादईसाठी गुरुवार, १६ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता पणजी येथील पाटो पुलावर महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. याद्वारे म्हादई वाचवण्यासाठीच्या आंदोलनाची धार वाढवली जाईल, असेही स्पष्ट केले आहे.
संघटनेचे नेते पर्यावरणप्रेमी प्रजल साखरदांडे म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयात म्हादईप्रश्नी गोव्याची बाजू मजबूत आहे. त्यामुळे गोवा म्हादईचा खटला हा जिंकणारच. म्हादईसाठी आता आंदोलनाची व्याप्ती वाढवली जाणार असून, त्याअंतर्गत राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये कोपरा बैठका होतील. शनिवारपर्यंत या बैठकांची समाप्ती केली जाईल. त्यानंतर रविवारी सर्व धर्मांच्या लोकांनी आपापल्या घरामध्ये पणती, मेणबत्ती, दिवे लावून म्हादई वाचवा, अशी प्रार्थना करावी. तसेच प्रार्थना करतानाचा फोटो किंवा व्हिडीओ हा सेव्ह म्हादई, सेव्ह गोवाच्या सोशल मीडियावर अपलोड करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संघटनेचे नेते महेश म्हांबरे, सलमान खान, अँथनी डिसिल्वा, मारियानो फरेरा, तनोज अडवलपालकर उपस्थित होते.
आधी जागृती, नंतर गोवा बंद
संघटनेचे नेते अॅड. हृदयनाथ शिरोडकर म्हणाले, की म्हादईचे पाणी हे केवळ माणसांनाच नव्हे तर पशु-पक्षी तसेच पर्यावरणासाठीसुध्दा महत्त्वाचे आहे. म्हादई गोव्याची जीवनदायिनी असून, तिचे पाणी हे सर्वांचीच गरज आहे. म्हादईसाठी परिणामी गोवा बंद केला जाईल. मात्र, गोवा बंद करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची विशेष दखल घेतली जाईल. त्यामुळे त्यासाठी अगोदर लोकांमध्ये जागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"