कलाकारांप्रमाणे मलाही कला अकादमी तेवढीच महत्त्वाची; मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2024 12:44 PM2024-06-21T12:44:06+5:302024-06-21T12:45:12+5:30
अकादमीला गतवैभव मिळवून देण्याचा विश्वास.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : केवळ कलाकारांनाच कला अकादमीची काळजी आहे असे नाही. त्यांच्याइतकीच माझ्यासाठीही अकादमी महत्वाची आहे, असे मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. अकादमीची वास्तू ४० वर्षे जुनी होती. त्यामुळे त्याचे नूतनीकरण करणेही तेवढेच गरजेचे होते. मी अकादमीच्या कामाचा पूर्ण आढावा घेतला आहे. अकादमीला गतवैभव मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी 'लोकमत'ला सदिच्छा भेट दिली. कला अकादमीच्या विषयाबाबत विचारले असता ते म्हणाले, 'अकादमीबाबत विनाकारण आरोप करण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अकादमीत गळती लागली होती. ती केवळ एका एसीमधील गळती होती. तसेच एका छोट्या खोलीतील सिलिंग पडल्याने गळती लागली. संपूर्ण कला अकादमीला गळती लागल्याचे जे बोलले जाते, ते अत्यंत चुकीचे आहे. त्याचप्रमाणे गेल्या पावसात जो खुल्या रंगमंचाचा भाग कोसळला, तोदेखील खूप जुना होता. त्यामुळे आता पुन्हा हा खुला रंगमंच बांधण्यात येणार आहे.'
मुख्यमंत्री म्हणाले की, 'सध्या अकादमीत डागडुजीचे काम सुरू आहे. तसेच जिथे गळती लागली, तिथे पाहणी करुन उपाययोजना सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण अकादमीची पाहणी संबंधितांना करायला लावली आहे.'
स्मार्ट सिटीच्या कामामुळे पणजीवासियांना खूप त्रास झाला, याची जाणीव मला आहे. मला हेही मान्य आहे की १०० टक्के पूर्तता नाही. मोठ्या प्रमाणावर कामे पूर्णत्वास आली आहेत. उर्वरीत कामेही लवकर पूर्ण होतील. भविष्यात कोणालाही त्रास होणार नाही, याचा विचार करुनच स्मार्ट सिटी योजनेतील कामांची आखणी केली आहे.
स्मार्ट सिटीची कामे सोपी नव्हती
मुख्यमंत्री म्हणाले की, 'पणजी शहरात स्मार्ट सिटी योजनेची कामे करणे सोपे नव्हते. जेव्हा पुढच्या २५ वर्षांचा विचार करून कामे हाती घेण्यात येतात, तेव्हा सर्वकाही पूर्ववत व्हायला थोडासा वेळ लागतोच. त्यातही जर पूर्वीचे, खूप जुने शहर असेल, तर त्या शहरात खोदकाम करुन अधिक चांगल्या सुविधा देणे हे कधीही कठीण काम ठरते. पणजीतील सांडपाणी वाहिनी खूप जुनी होती. ती पूर्ण बदलण्यात आली, जेणेकरुन भविष्यात लोकांना त्रास होणार नाही. उर्वरीत कामांची पुर्तता लवकरात लवकर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.