तुम्हाला काम हवंय? ‘आधार’शी जोडा जॉब कार्ड; सरकारची मोहीम, ३९ हजारपैकी ७ हजार अॅक्टिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 12:35 PM2023-03-06T12:35:54+5:302023-03-06T12:36:33+5:30
केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार आधार कार्डशी जॉब कार्ड जोडणे हे सक्तीचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: बोगसगिरीला चाप बसवण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील मजुरांचे जॉब कार्ड आधार कार्डशी जोडले जात आहेत. देशभराप्रमाणेच गोव्यातसुद्धा ही मोहीम ग्रामीण विकास एजन्सीच्या माध्यमातून हाती घेतली आहे. देशभरात १६.९१ कोटी जॉब कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. यामुळे मजुरांच्या कामांवर लक्ष ठेवण्याबरोबरच त्यांना दिल्या जाणाऱ्या मजुरीच्या रकमेत वाढ करणेही शक्य होईल.
केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार आधार कार्डशी जॉब कार्ड जोडणे हे सक्तीचे आहे. अन्यथा, जॉब कार्डधारकांना या योजनेच्या सुविधा मिळणार नाहीत.
ऑफलाईनने करा लिंक
आधार कार्डशी जॉब कार्ड जोडणे हे ऑफलाईन पद्धतीने केले जाऊ शकते. आपण पंचायत सचिव, पंचायत सदस्यांकडे जाऊन ही प्रक्रिया केली जाऊ शकते. जॉब कार्ड लिंक झाल्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत मजुरांना सुविधा मिळतील. दोन्ही लिंक करण्यासाठी जॉब कार्ड क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, पोस्ट किंवा बँक खात्याचा क्रमांक, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अतंर्गत पूर्ण केलेले व सध्या सुरु असलेल्या कामाची माहिती नमूद करणे गरजेचे आहे.
३९ हजार जॉब कार्ड
- गोव्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत ३९ हजार जणांना जॉब दिले असल्याची माहिती त्यांच्या संकेत- स्थळावर उपलब्ध आहे.
- यापैकी सुमार ७ हजार जॉब कार्ड हे अॅक्टिव्ह आहेत. २०१८- १९ मध्ये या योजनेसाठी केंद्र सरकारने ४८ कोटींचा निधी दिला होता.
गोव्यातही मोहीम
- महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील मजुरांचे जॉब कार्ड आधार कार्डशी जोडण्याची मोहीम गोव्यातही सुरु आहे.
- या योजनेअंतर्गत अनेकजण जॉब कार्डच्या आधारे काम करीत आहे. गोव्यात १२ तालुक्यांमध्ये १९१ ग्राम पंचायती असून त्यात या योजनेअंतर्गत हे लोक काम करीत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"