किल्ल्यावर दारू दुकान: ही तर क्रूर थट्टा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 03:53 PM2023-02-22T15:53:04+5:302023-02-22T15:53:30+5:30
बाकी बाब बोरकरांचे 'माझ्या गोव्याच्या भूमीत' हे गीत आणि दामोदर कारे यांच्या 'स्मरुनी गोमंत देवी' या गीतांतला गोवा आता शिल्लकच नाही याची खंत वाटते.
अनिल प. आचार्य, पर्वरी
गोव्याचे एक महान स्वातंत्र्यसैनिक नागेशबाब करमली यांचं हल्लीच निधन झालं. त्यांचे सुपुत्र रामदासबाब करमली आपल्या वडिलांच्या अस्थी आग्वादला समुद्रात विसर्जित करण्यासाठी म्हणून गेले होते. आग्वाद किल्ल्याला त्यांनी भेट दिली तेव्हा ज्या गोष्टी त्यांच्या नजरेस पडल्या त्या त्यांनी समाजमाध्यमांद्वारे लोकांच्या नजरेस आणून दिल्या आहेत.
आग्वाद किल्ल्यामधील सद्य परिस्थितीविषयी लिहिलेला मजकूर मी वाचला आणि धक्काच बसला. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या काळात एका वेगळ्या संदर्भात 'सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?' असा राकठोक प्रश्न विचारणारा एक अग्रलेख लिहिलेला होता, त्याची आठवण झाली. पर्वरी जिथे पूर्वी स्वातंत्र्य सैनिकांना बंदिवासात ठेवलेलं होतं, त्या खोल्यांचं आता म्युझियममध्ये रूपांतर केलेलं आहे. स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित काही गोष्टी तिथं ठेवलेल्या आहेत. काही पुतळेही ठेवलेले आहेत. इथपर्यंत ठीक आहे. पण एक दारूचं दुकान, ज्या प्रकारे त्याची केलेली सजावट, तिथं लिहिलेला मजकूर पाहाता स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांनी दिलेला लढा हा सरकारनं थट्टेचा विषय करून टाकला आहे.
गोव्याच्या मुक्तिसंग्रामात अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. फक्त गोव्यातलेच नव्हेत तर देशाच्या विविध भागातल्या लोकांनीसुद्धा गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करले आहे. या लढ्यात माझे वडील परशुराम आचार्य यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. माझे आजोबा श्रीनिवास आचार्य यांनी याच आग्वाद तुरुंगात साडेचार वर्षे तुरुंगवास सोसला होता. त्यांच्यासारख्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी या तुरुंगात हालअपेष्टा आणि अत्याचारांना तोंड दिले होते.
पर्यटनाच्या नावाखाली सगळं काही माफ अशी एक धारणा इथं बनलेली आहे आणि जे काही सुरू आहे ते पाहता गोव्यासाठी एक वेगळंच संविधान लिहून ठेवलेले आहे की काय, असा प्रश्न पडावा.
होता. गोव्याची खरी ओळख 'योगभूमी' हीच असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. गोव्यातील त्यांच्या अनुयायांपैकी एखाद्यानं तरी त्यांना आग्वादला नेऊन ही 'योगभूमी' दाखवायला हवी होती.
योगभूमीचं 'भोगभूमी'त परिवर्तन करण्याचं काम मगो पक्षाच्या सरकारानंतर जी सरकार सत्तेवर आली त्यांनी अविरतपणे केलं. गोव्यासारख्या एवढ्याशा छोट्या राज्यात जेवढी दारूची दुकानं आहेत तेवढी या देशात कुठेच असणार नाहीत. महसूल वाढविण्याच्या निमित्ताननं दारूसोबत कसिनो, जुगार व इतर अवैध गोष्टींना सरकारकडून उत्तेजन मिळू लागलं. इथं सगळं काही स्वस्तात आणि उघडरीत्या मिळतं अशी देशभर प्रतिमा निर्माण होण्यास राज्यकर्त्यांचाच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लागलेला आहे. ते मग कुठल्याही राजकीय पक्षाचे असोत. सर्वांनीच कमरेचं काढून डोक्याला गुंडाळलेलं आहे. आता त्यांनी आपला मोर्चा आग्वाद किल्ल्याकडे वळविला आहे. बाकी बाब बोरकरांचे 'माझ्या गोव्याच्या भूमीत' 'हे गीत आणि दामोदर कारे यांच्या 'स्मरुनी गोमंत देवी' या गीतांनी वर्णिलेला गोवा आता शिल्लकच राहिलेला नाही याची खंत वाटते. सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून सरकारनं ते दारूचं दुकान त्वरित बंद करावं. पाहिजे तर त्या जागेवर खास गोमंतकीय पद्धतीचं शाकाहारी, मांसाहारी जेवण पर्यटकांना अनुभवण्यासाठी उपलब्ध करून द्यावं. चहापानाची दर्जेदार व्यवस्था करावी. पण हे दारूचं दुकान वेळ न गमावता बंद करावं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"