कदंब महामंडळाच्या पणजी-हैदराबाद बसमधून दारुची तस्करी; दोन चालक निलंबित
By किशोर कुबल | Published: January 8, 2024 12:51 PM2024-01-08T12:51:29+5:302024-01-08T12:53:54+5:30
तेलंगणात कारवाई : अबकारी अधिकाय्रांनी एक लाख रुपये किमतीच्या मद्याच्या बाटल्या केल्या जप्त.
किशोर कुबल, पणजी : कदंब महामंडळाच्या पणजी-हैदराबाद बसमधून दारुची तस्करी केल्या प्रकरणी दोन बसचालकांना तेलंगणात संगारेडी येथे तेथील अबकारी अधिकाय्रांनी ताब्यात घेतल्यानंतर या दोघांनाही सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सुमारे १ लाख रुपये किमतीच्या दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. निलंबित करण्यात आलेल्या चालकांची नावे उल्हास हरमलकर व आबासाहेब राणे अशी आहेत.
कदंब महामंडळाचे अध्यक्ष आमदार उल्हास तुयेंकर यांनी यास दुजोरा दिला. मिळालेल्या माहितीनुसार कदंबची जीए-०३-एक्स-०४७८ क्रमांकाची बस पणजीहून हैदराबादला निघाली होती. ही बस हैदराबादला पोचण्यास अवघे काही अंतर राहिले असता संगारेडी येथे अबकारी अधिकाय्रांनी ती अडवून झडती घेतली असता देशी बनावटीच्या विदेशी दारुच्या बाटल्या आढळून आल्या.
शनिवारी सायंकाळी पणजीहून हैदराबादला निघालेल्या या बसमध्ये ४४ प्रवासी होते. हा गट गोव्यात सहलीसाठी आला होता व सर्वांनी एकाचवेळी तिकिटे आरक्षित केली होती. दीर्घ पल्ल्याच्या बसवर वाहक नसतो. दोन चालक होते त्यांना अबकारी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. ही माहिती मिळताच दोघांनाही तात्काळ निलंबित करण्यात आले.
महामंडळाचे अध्यक्ष तुयेंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमदर्शनी दोन्ही चालकांना जबाबदार धरुन कारवाई केली असली तरी या चालकांनी तस्करीचे आरोप फेटाळलेले आहेत. प्रवाशांपैकी कोणीतरी या बाटल्या आणल्या असाव्यात असे या चालकांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे. तूर्त या प्रकरणात जबाबदार धरुन दोघांना निलंबित केले आहे.