असाही चमत्कार! औषधांची अर्ध्या मार्गावर झाली दारू; उत्पादन शुल्क विभागानं पकडलं
By वासुदेव.पागी | Published: December 21, 2023 03:17 PM2023-12-21T15:17:35+5:302023-12-21T15:17:40+5:30
गोव्यातून पुण्यात होणारी ८२ लाखाची दारू तस्करी पकडली
पणजी: गोव्यातून पुणे येथे औषधांच्या नावावर दारू नेली जात होती. असाच एक दारूचा ट्रक महाराष्ट्राच्या उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पुण्याजवळील खेड शिवापूरजवळ पकडला आहे. ट्रकची तपासणी केली असता औषधांची बॉक्से सापडली. परंतु औषधांच्या बॉक्समध्ये तब्बल ८२ लाख रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या सापडल्या. दारू ट्रकसह जप्त करण्यात आली आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांसाठी ही दारू नेण्यात येत असल्याचा संशय आहे. इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात दारू स्वस्त असल्यामुळे तसेच महाराष्ट्रातील खूप महाग असल्यामुळे गोव्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी होते. दारूची तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र अबकारी विभागाकडून चेक नाक्यावर केली पाहणी केली जात होती. परंतु अलीकडे या तपासणीत शिथिलता आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार औषधांच्या नावे दारू खरेदी करून त्याची तस्करी करण्याचे काम मागील बऱ्याच दिवसापासून सुरू होते. याची माहिती महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यामुळे या ट्रकला अडवून तपासणी करण्यात आली होती. या रॅकेटमध्ये कोण कोण गुंतले आहेत त्यांचा छडा लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाकडून गोवा अबकारी खात्याचीही मदत घेतली जाण्याची शक्यता आहे.