मनापासून लिहलेल्या साहित्याला भाषेचे अडथळे येत नाहीत - मर्सी मार्गारेट
By समीर नाईक | Published: February 17, 2024 04:17 PM2024-02-17T16:17:08+5:302024-02-17T16:17:24+5:30
गोवा कोंकणी अकादमतर्फे व्ही. एम साळगांवकर कायदा महाविद्यालय यांच्या साहाय्याने आयोजित २३ वे युवा कोंकणी साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे या नात्याने मार्गारेट उपस्थित होत्या.
पणजी: साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठलीही भाषा कधीच अडथळा ठरत नाही. मनापासून लिहलेले कुठलेही साहित्य एकाद्याच्या मनापर्यंत सहज पोहचत असते, हेच साहित्याचे सौंदर्य आहे, असे प्रतिपादन तेलंगणा येथील प्रसिद्ध साहित्यिक मर्सी मार्गारेट यांनी केले.
गोवा कोंकणी अकादमतर्फे व्ही. एम साळगांवकर कायदा महाविद्यालय यांच्या साहाय्याने आयोजित २३ वे युवा कोंकणी साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे या नात्याने मार्गारेट उपस्थित होत्या. यावेळी त्यांच्यासोबत गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष वसंत सावंत, सचिव मेघना शेटगावकर, कोंकणी भाषा मंडळच्या अध्यक्ष अन्वेशा सिंगबाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.
गोव्यातील युवा खूप नशीबवान आहे की त्यांना युवा स्थितीत साहित्य क्षेत्रात आपली छाप सोडण्याची संधी मिळत आहे. कोंकणी भाषेला हा मोठा मान आहे. कोंकणीच्या तुलनेत तेलगुतील साहित्य खूप कमी आहे, तसेच तेथील युवकांना देखील संधी आणि प्रोत्साहन कमीच मिळत असते. साहित्य संमेलनातून नेहमीच काही नवीन शिकायला मिळते, त्यामुळे यंदा देखील ही संधी आम्हाला मिळाली आहे, याचा पुरेपूर उपयोग आपले साहित्य अधिक समृध्द करण्यासाठी आपण केला पाहिजे, असे मार्गारेट यांनी यावेळी सांगितले.
साहित्य लीहताना मनात संभ्रम असणे महत्वाचे आहे. आपण जे लिहिले आहे, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या लायकीचे आहे की नाही, याबाबत मनात सातत्याने प्रश्न येणे आवश्यक आहे. तरच आमचे साहित्य अधिक दर्जेदार होऊ शकते, तसेच या वाटचालीत नेहमीच मोठ्या साहित्यिकांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. कोंकणी भाषेचा प्रचार व प्रसार हा आमच्या पिढी मोठी जबाबदारी आहे, असे यावेळी सिंगबाळ यांनी सांगितले.
सदर साहित्य संमेलन रविवारपर्यंत चालणार असून, या दरम्यान विविध चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील अनेक वक्ते यावेळी उपस्थित असणार आहे. तसेच विविध पुरस्कार यादरम्यान देण्यात येणार आहे.