मोपा विमानतळावर बँक अधिकाऱ्याच्या बॅगेत सापडली जिवंत काडतुसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2024 16:37 IST2024-05-27T16:31:31+5:302024-05-27T16:37:08+5:30
मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईला जाण्यासाठी आलेल्या एका बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बॅगेत जिवंत काडतुसे आढळली.

मोपा विमानतळावर बँक अधिकाऱ्याच्या बॅगेत सापडली जिवंत काडतुसे
पेडणे : मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईला जाण्यासाठी आलेल्या एका बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बॅगेत जिवंत काडतुसे आढळली. या अधिकाऱ्याला सुरक्षा यंत्रणेने तातडीने ताब्यात घेतले. गुरुप्रसाद पटनाईक असे या अधिकाऱ्याचे नाव असून तो ओडिसा राज्यातील आहे. त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विमानतळावरील सूरक्षा यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळावर मुंबईला जाण्यासाठी ओडिसा येथील गुरुप्रसाद पटनाईक हा बँक अधिकारी दुपारी आला होता. त्यांच्या बॅगेचे स्कॅनिंग करताना सुरक्षा यंत्रणेला जिवंत काडतुसे सापडली. त्यामुळे सुरक्षा अधिकाऱ्यांनी याबाबत कसून चौकशी केली. जी जिवंत काडतुसे सापडली, त्याविषयीचा परवाना अथवा कोणतीही माहिती गुरुप्रसाद पटनाईक हा देऊ शकला नाही. कोणत्याच प्रकारचा परवाना दाखवला नसल्यामुळे मोपा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे विमानतळावरील एएसजी युनिटचे अधिकारी अविनाश शुक्ला यांनी मोपा पोलिस स्थानकात याबाबतची तातडीने तक्रार नोंदवली. पोलिस उपनिरीक्षक दीपक हळणकर कपास करीत आहेत.