गणेश चतुर्थीच्या तोंडावर बार्देशात भारनियमन लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 10:58 PM2019-08-27T22:58:41+5:302019-08-27T22:59:01+5:30
गणेश चतुर्थीच्या तोंडावर म्हापसा आणि थिवीतील विजेच्या उपकेंद्रावरून शहराला पुरवठा करणारा एक ट्रान्सफॉर्मर निकामी झाल्याने शाहराबरोबर बार्देस तालुक्यातील काही पंचायत क्षेत्रातील पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
म्हापसा : गणेश चतुर्थीच्या तोंडावर म्हापसा आणि थिवीतील विजेच्या उपकेंद्रावरून शहराला पुरवठा करणारा एक ट्रान्सफॉर्मर निकामी झाल्याने शाहराबरोबर बार्देस तालुक्यातील काही पंचायत क्षेत्रातील पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून शहरात तसेच परिसरात भारनियमन लागू करण्यात आले असून निकामी झालेला ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी किमान दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
म्हापशातील गणेशपुरी भागात असलेल्या विजेच्या उपकेंद्रातील १० एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर मंगळवारी निकामी झाल्याने तसेच थिवीतील ट्रान्सफॉर्मर सुमारे १० दिवसांपासून निकामी झाल्याने त्याचे परिणाम पुरवठ्यावर झाले आहेत. शहराबरोबर गिरी, आसगाव, हणजूण, वागातोर, पर्रा, शिवोली, सडये, ओशेल या पंचायत क्षेत्रातील पुरवठ्यावर त्याचे परिणाम झाले आहेत. मंगळवारी सकाळी पुरवठा सततपणे खंडित होण्यास सुरुवात झाली होती त्यानंतर दुपारी भारनियमन सुरू करण्यात आले होते. तसेच लागू करण्यात आलेल्या भारनियमनाचे परिणाम शहरातील व्यापारी वर्गांना सहन करावे लागले.
त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयातील कामकाजावर त्याचे परिणाम झाले होते, तर नादुरुस्त झालेला थिवीतील ट्रान्सफॉर्मर अद्याप बदलण्यासाठी पावले उचलण्यात आली नाहीत. तसेच जो ट्रान्सफॉर्मर निकामा झाला आहे त्यावर पुरवठा करणारे चार फिडर आहेत. या फिडर वरून शहराला तसेच सभोवतालील पंचायत क्षेत्रातील पुरवठा केला जातो. तसेच सदर ट्रान्सफॉर्मर विद्युत खात्याच्या नियंत्रण कक्षाला लागून असल्याने तो हटवण्यासाठी व त्याच्या जागी दुसरा बसवण्यासाठी खात्याला के्रनचा वापर करणे गरजेचे आहे. याचे परिणाम पुरवठ्यावर होणार आहेत. या कारणामुळेही पुरवठा पुर्ववत होण्यासाठी विलंब होण्याची संभावना आहे.
या संबंधीत खात्याचे कार्यकारी अभियंता प्रदीप नार्वेकर यांना विचारले असता ट्रान्सफॉर्मर निकामी झाल्याचे त्यांनी मान्य केले. सदर ट्रान्सफॉर्मरची पाहणी मडगावातील अभियंत्यांकडून केल्यानंतर तो नादुरुस्त झाल्याचे त्यांच्याकडून जाहीर करण्यात आल्याचे सांगितले. निकामी झालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी तेवढ्याच क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर लवकरच बसवण्यात येणार असल्याचे नार्वेकर म्हणाले; पण त्या संबंधीचा निश्चित कालावधी मात्र ते स्पष्ट करु शकले नाही. सदर ट्रान्सफॉर्मर बदलेपर्यंत शहरात नियंत्रीत प्रमाणावर पुरवठा करावा लागणार आहे.
शहरातील काही भागा बरोबर बस्तोडा पंचायत क्षेत्रातील पुरवठा सोमवारी रात्री पासून खंडित होता. मध्यरात्री दीडच्या सुमाराला खंडित झालेला पुरवठा मंगळवारी सकाळी ९.३० च्या दरम्यान पुन्हा सुरू करण्यात आला; पण काही कालावधीनंतर पुरवठा पुन्हा खंडित होवून मंगळवारी उशीरा पुन्हा सुरू करण्यात आला होता. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार थिवीतील उपकेंद्रावरील सुद्धा एक ट्रान्सफॉर्मर सुमारे १० दिवसांपूर्वी निकामी झाला असून हा बदलण्यात आला नसल्याने परिसरातील काही भागातील पुरवठ्यावर परिणाम झाले आहेत. त्यातून लोकांचे हाल झाले आहेत. या संबंधी त्या भागातील कार्यकारी अभियंता संदीप देसाई यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद असल्याने ते उपलब्ध होवू शकले नाही.