पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा लोबोंनी वाचला पर्रीकरांसमोर पाढा
By admin | Published: February 27, 2015 02:12 AM2015-02-27T02:12:32+5:302015-02-27T02:14:05+5:30
पणजी : बेकायदा डान्स बार प्रकरणात सरकारवर हल्लाबोल करणारे आमदार मायकल लोबो यांनी गुरुवारी दिल्लीत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर
पणजी : बेकायदा डान्स बार प्रकरणात सरकारवर हल्लाबोल करणारे आमदार मायकल लोबो यांनी गुरुवारी दिल्लीत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन राज्य प्रशासनाचे अपयश तसेच पोलिसांची अकार्यक्षमता याबाबत पाढाच वाचला. पार्सेकर सरकारातील मंत्रीही स्वत:च्या मतदारसंघापुरतीच कामे करतात, इतर मतदारसंघांकडे त्यांचे लक्ष नाही, अशी तक्रारही लोबो यांनी पर्रीकरांकडे केली.
प्राप्त माहितीनुसार, या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. कळंगुटमध्ये डान्स बारसाठी केलेली बेकायदा बांधकामे, किनारपट्टीत फोफावलेला ड्रग्स व्यवहार तसेच पर्रीकर केंद्रात गेल्यानंतर एकूण गोव्यातील जी स्थिती आहे, त्यासंबंधी लोबो यांनी विवेचन केले. लोकांची कामे वेळेवर होत नाहीत. फाईल्स या टेबलवरून त्या टेबलवर फिरतात. काँग्रेस सरकारने कु कर्मे केली म्हणून लोकांनी भाजपला निवडून दिले, ही गोष्ट विसरून चालणार नाही. बेकायदा गोष्टींबाबत आवाज उठवणे, हे आपले काम आहे आणि आपण नेहमीच ते करणार, असेही त्यांनी पर्रीकरांना सांगितले.
पर्रीकर यांनी आपण या प्रकरणात लक्ष घालतो, असे आश्वासन दिलेले आहे, असे लोबो यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, पर्रीकर शुक्रवारी एक दिवसाकरिता गोव्यात येत आहेत. त्यानंतर १ मार्च रोजी ते पुन्हा
गोव्यात येतील. त्या वेळी सविस्तर बोलू, असे लोबो यांना त्यांनी सांगितलेले आहे.
(प्रतिनिधी)