आपल्याला उमेदवारी नाकारण्यास स्थानिक नेतृत्व जबाबदार : विजय भिके
By काशिराम म्हांबरे | Published: April 6, 2024 03:29 PM2024-04-06T15:29:16+5:302024-04-06T15:29:51+5:30
विजय भिके यांना पक्षाकडून लोकसभेसाठी उमेदवारी नाकारल्याच्या कारणास्तव त्यांनी स्थानिक पक्ष नेतृत्वावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
म्हापसा: उत्तर गोव्यातून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले पक्षाचे महासचिव विजय भिके यांना पक्षाकडून लोकसभेसाठी उमेदवारी नाकारल्याच्या कारणास्तव त्यांनी स्थानिक पक्ष नेतृत्वावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप यांच्यासोबत भिके हे सुद्धा इच्छुकांच्या यादीत होते. भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांचे प्रतिस्पर्धी म्हणून खलप यांना उत्तर गोव्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भीके यांना सतत दोन वेळा म्हापसा मतदार संघातून विधानसभेचे तसेच आता उत्तर गोव्यातून लोकसभेसाठीची उमेदवारी नाकारण्यात आली आहे. पक्षाचे स्थानिक नेतृत्व दिल्लीतील वरिष्ठ पातळीवर युवा नेत्यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी अपयशी ठरले असल्याचा तसेच आपल्याला उमेदवारी मिळवून देण्यासाठी स्थानिक नेतृत्व जबाबदार असल्याचा आरोप भिके यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. मागील अनेक वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य केल्याचे हीच पावती आपल्याला मिळते का असा ही प्रश्न त्यांनी केला. युवा नेत्यांना उमेदवारी नाकारल्याने पक्षात नवी पिढी कशा पद्धतीने तयार होईल, त्यांना न्याय कसा मिळेल असाही प्रश्न त्यांनी केला.
स्थानिक पक्षनेते यापूर्वी सुद्धा अपयशी ठरले असून आता ही ते अपयशी ठरतील असाही दावा भिके यांनी बोलताना केला. उमेदवारी देण्यात आलेले खलप यांना यापूर्वी उत्तर गोव्यातून तीन वेळा उमेदवारी देण्यात आली असल्याची आठवण भिके यांनी करून दिली.
पक्षाने आपल्याला संधी दिल्याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार मानले आहेत. तसेच भविष्यात पक्षासाठी कार्य करीत राहण्याचे, पक्षाकडून घेतल्या जाणाऱ्या चुकीच्या निर्णयाविरोधात आवाज उठवण्याचे तसेच नवी पिढी तयार करण्यास कार्यरत राहण्याचे आश्वासनही भिके यांनी दिले.