कॅसिनो आग्वादला हलविण्यास कळंगुट, साळगांवमधील स्थानिकांचा तीव्र विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 03:02 PM2019-10-03T15:02:07+5:302019-10-03T15:02:19+5:30
मांडवी नदीतील कॅसिनो आग्वाद येथे हलवण्यास कळंगुट आणि साळगाव मतदारसंघातील लोकांनी जोरदार विरोध केला आहे.
पणजी: मांडवी नदीतील कॅसिनो आग्वाद येथे हलवण्यास कळंगुट आणि साळगाव मतदारसंघातील लोकांनी जोरदार विरोध केला आहे. कळंगुट मतदारसंघ फोरम व पिळर्ण नागरिक नागरिक समिती या प्रश्नावर एकत्र आली असून स्थानिक आमदार तथा बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांना इशारा देत या प्रश्नावर प्रसंगी रस्त्यावर येऊ, असे ठणकावून सांगितले आहे.
पत्रकार परिषदेत कळंगुट मतदारसंघ फोरमचे अध्यक्ष प्रेमानंद दिवकर यांनी लोबो हे पर्यटनाच्या नावाखाली कॅसिनोना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला. कॅसिनोंमुळे ड्रग्स, वेश्याव्यवसाय आणखी फोफावेल, कळंगुटमध्ये पर्यटन हंगामात आधीच वाहतुकीची मोठी कोंडी होते त्यात आणखी भर पडेल तसेच अन्य अनेक प्रश्न उद्भवतील असे दिवकर म्हणाले. तसेच कॉंग्रेस सरकारच्या काळात मांडवीत तीन कॅसिनो आले परंतु त्यानंतर भाजप सरकारने आणखी चार आणले आणि आता मांडवीतील त्यांची संख्या सात बनली असल्याचे देखील दिवाकर यांनी स्पष्ट केले आहे.
कॅसिनो हे उत्पन्नाचे साधन असे सरकारला वाटत असेल तर सरकारने हे स्पष्ट करावे लागेल की, कॅसिनोपासून आजवर मिळालेला महसूल कुठे गेला? हा पैसा सरकारी तिजोरीत गेला की आमदारांच्या खिशात? गेल्या दहा वर्षांच्या बाबतीत सरकारने जनतेसाठी हे स्पष्ट करावे लागेल असे देखील सांगण्यात आले.
पिळर्ण सिटीझन फोरमचे अध्यक्ष प्रकाश बांदोडकर म्हणाले की, लोबो यांनी लोकांना मूर्ख बनवणे चालू केले आहे. सागवान येथे कॅसिनो हलवल्यानंतर त्याचा फायदा कुणाला होणार हे आधी त्यांनी स्पष्ट करावे. भाजप सरकारने आता कॅसिनोना प्रोत्साहन देणे सुरू केले आहे. याच भाजपने विरोधात असताना पणजीत मशाल मिरवणुका काढल्या आणि कसिनोंना विरोध केला होता. कॅसिनोंच्या कार्यालयावर भाजपने धडक दिली होती, आणि राज्यात कुठेही कसिनो खपून घेणार नाही असे त्यावेळी ठणकावून सांगितले होते. या भूमिकेत आताच कसा काय बदल झाला?, असा सवाल बांदोडकर यांनी केला. ते म्हणाले की लोबो या विषयावर लोकांची फसवणूक करत आहेत.
कॅसिनो आग्वादला न्यायचे नसतील तर इन्स्पेक्शन कशा करता केले हे जनतेला कळायला हवे. तिथे कॅसिनो आल्यास नेरूलची मिठागरे दूषित होतील. मत्स्य संपत्ती नष्ट होईल. या भागातील मच्छिमार 'तिसऱ्यो', 'कालवां' आदी शिंपले काढून उदरनिर्वाह करतात. शिंपले नष्ट होतील सिकरी ते बागा पट्टा आधीच वर्दळीचा बनलेला आहे. वाहतूक कोंडी येथील नित्याचाच प्रकार बनला आहे. मायकल लोबो हे दोन वर्षांपूर्वी कसीनोंना विरोध करत होते. आताच त्यांची भूमिका बदलली कशी? असा सवाल बांदोडकर यांनी केला. पत्रकार परिषदेला कळंगुट, साळगांवमधील अन्य काही नागरिकही उपस्थित होते.